नाशिक रोड रेल्वेस्थानकाचे ८१ कोटींचे नुकसान; कोरोनामुळे रेल्वेबंदचा फटका

नाशिक रोड : रेल्वेस्थानकाला कोरोनामुळे एप्रिल २०२० ते डिसेंबर या नऊ महिन्यांत तब्बल ८१ कोटी ८७ लाखांचा फटका बसला आहे. एप्रिल २०१९ ते डिसेंबरदरम्यान रेल्वेने तब्बल ११७ कोटी ९७ लाखांचे उत्पन्न मिळविले होते. मागील वर्षी अवघे ३६ कोटी दहा लाख रुपये मिळाले. 

प्रतिवर्षी प्रवासी, माल वाहतूक (गुड्स) विभागामार्फत रेल्वेला कोट्यवधीने महसूल मिळतो. मात्र, गेल्या वर्षी थैमान घातलेल्या कोरोनाचा रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला. गेल्या वर्षी २२ मार्चपासून प्रवासी रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. भारताच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण देशात प्रवासी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली. गाड्या बंद केल्याने परिणामी जनरल तिकिटांसह आरक्षित तिकिटेही रद्द करण्यात आली. २२ मे २०२० पासून पुन्हा टप्प्याटप्प्याने कोविड विशेष ट्रेन सुरू करण्यात आल्या. गर्दी होऊ नये म्हणून केवळ आरक्षित तिकिटांचीच सुविधा प्रवाशांना देण्यात आली. सध्याच्या परिस्थितीत ७० टक्के कोविड विशेष ट्रेन धावत आहेत. मात्र, जनरल तिकीट बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः दूरच्या बाहेरगावी जायचे झाल्यास प्रवाशांची मोठी पंचाईत होत आहे. तिकीट आरक्षित करण्यासाठी दोन ते तीन दिवस लागतात. जनरल तिकिटांची व्यवस्था असल्यास कधीही तिकीट काढून प्रवास करता येऊ शकतो. मात्र, जनरल तिकीट सध्या बंद आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानक देशातील प्रमुख स्थानकांपैकी एक आहे. दररोज येथून १५ ते १६ हजार प्रवासी प्रवास करतात. नाशिकहून पंचवटी एक्स्प्रेसने बहुसंख्य नोकरदार प्रवास करतो. मात्र, जनरल तिकीटप्रमाणेच, मासिक पासही बंद असल्याने नोकरदारांचे हाल होत आहेत. 

 हेही वाचा - लग्नबेडीपुर्वीच हाती पडल्या पोलिसांच्या बेड्या! नवरदेवाचे ते स्वप्न अपुरेच..

जनरल तिकीट लवकरच सुरू होणार 
जवळपास दहा ते ११ महिन्यांपासून जनरल तिकीट यंत्रणा बंद आहे. मात्र, लवकरच जनरल तिकीट सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने नाशिक रोडवरील अधिकाऱ्यांना जनरल तिकिटांचे मशिन अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे येत्या आठवड्यात जनरल तिकीट कधीही सुरू होऊ शकते.  

हेही वाचा - अवघ्या चारच दिवसांवर बहिणीचं लग्न अन् लग्नघरातूनच निघाली अंत्ययात्रा; दुर्दैवी घटना