नाशिक रोड रेल्वेस्थानकाहून आता ‘टू व्हिलर टॅक्सी’; जानेवारीपासून होणार सुरवात

नाशिक रोड : नाशिक रोड रेल्वेस्थानकावर सध्या टू व्हिलर शेअर म्हणजेच टू व्हिलर टॅक्सीचा प्रयोग राबवला जात आहे. उबेर, ओला रिक्षांच्या धर्तीवर ‘टू व्हिलर शेअर सिस्टिम’ ही अभिनव संकल्पना राबवली जाणार आहे. रोजगाराची कमतरता आणि उपलब्ध संधीचा फायदा घेण्यासाठी ही संकल्पना राबवीत असल्याचे डॉ. गिरीश मोहिते यांनी सांगितले. 

नाशिक रोड रेल्वेस्थानकावरून उतरल्यावर एक व्यक्ती असेल, तर त्या व्यक्तीला बस, रिक्षा पकडण्यासाठी कसरत करावी लागते. नाशिकला जाण्याचा प्रवास परवडतही नाही. महामार्गापासून नियोजित ठिकाण आतमध्ये असेल, तर पायपीट करून जावे लागते. या सर्वांवर रामबाण इलाज म्हणून शेअर टू व्हिलर सिस्टिम ही संकल्पना उदयास आली आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानकावर प्रवासी उतरल्यावर तो शेअर टू व्हिलर सिस्टिम या ॲपवरून दुचाकीस्वाराला नाशिक रोड रेल्वेस्थानकाजवळ बोलावून नियोजित ठिकाणी शहरात प्रवास करू शकतो. 

अशी असेल शेअर सिस्टिम 

टू व्हिलर टॅक्सीमध्ये प्रतिकिलोमीटर पाच रुपये याप्रमाणे भाडे प्रवासी दुचाकीस्वाराला देण्यात येतील. प्रत्येक दुचाकीला नंबर व जीपीआरएस सिस्टिम असेल. त्यामुळे दुचाकी कोणत्या परिसरात आहे, हेही प्रवाशाला माहिती होऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने मदत होईल. प्रवाशांनी प्ले स्टोरवर हे ॲप डाउनलोड केल्यावर त्यांना दुचाकीस्वार रेल्वेस्थानकावर घ्यायला येऊ शकतो. यातून हव्या त्या ठिकाणी तो सोडून प्रतिकिलोमीटर पाच रुपये भाडे आकारणार आहे. ओलासारखीच ही सिस्टिम सध्या विकसित होत आहे. जानेवारीपासून सुरवात होणार आहे. तांत्रिक गोष्टी सर्व पडताळल्या जात असून, दुचाकींना जीपीआरएस सिस्टिम बसवण्याचे काम सुरू आहे. 

हेही वाचा >> मनाला चटका लावणारी बातमी! माऊलीच्या नशिबी दोनदा दफनविधी अंत्यसंस्काराचा योग; जुळली मुलांशी झालेली ताटातूट

बेरोजगारांना रोजगार 

या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार दिला जात असून, आजपर्यंत ९० युवकांनी या टू व्हिलर टॅक्सी संकल्पनेत काम करण्याची तयारी दर्शवली आहे. यासंबंधी तांत्रिक व प्रशासकीय बाबी लवकरच पूर्ण होणार असून, जानेवारीपासून संकल्पनेचा श्रीगणेशा होणार आहे. ही आधुनिक गरजवंत आणि नवनिर्माण क्षम कार्यप्रणाली सर्वांच्याच कुतूहलाचा विषय ठरत आहे. 

सध्या संशोधन आणि विकास या तत्त्वावर नव्वद युवकांनी या सिस्टिममध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या गाड्यांना जीपीआरएस सिस्टिम बसवली जाणार आहे. शहरात कोठेही जायचे असल्यास दुचाकीवरून व्यक्तीला प्रवास करता येणार आहे. अडगळीच्या ठिकाणी अथवा आतमध्ये रिक्षा व बस जात नसल्यास अशा ठिकाणी जायला या कार्यप्रणालीचा फायदा होत असून, जानेवारीपासून ही कार्यप्रणाली आम्ही सुरू करीत आहोत. 
- डॉ. गिरीश मोहिते, मुख्य समन्वयक   

हेही वाचा >> बळीराजाच्या नशिबी दुर्दैवच; जेव्हा स्वत:च्याच डोळ्यादेखत संसाराची राखरांगोळी होते तेव्हा..