नाशिक : लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून शेतकऱ्याची फसवणूक

शेतकरी फसवणूक,www.pudhari.news

नगरसूल (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येवला तालुक्यातील खरवंडी येथील शेतकऱ्याला लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या संशयित अरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

१ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ च्या सुमारास योगेश हरिभाऊ झाल्टे (३५, रा. खरवंडी, ता. येवला) हे त्यांच्या घरी असताना संशयित आरोपीने फिर्यादीस कुलस्वामिनी सेल्स मार्केटिंग बिझनेस प्रा. लि. गृहयोजना या लकी ड्रॉ कूपनवर इलेक्ट्रिक वस्तू, शेती अवजारे, ट्रॅक्टर, फोरव्हीलर, टूव्हीलर अशा वस्तू असल्याचे सांगितले. त्यानुसार फिर्यादीस दोन कूपन देऊन पहिल्या कूपनवर ३०० लिटर फायबरची पाण्याची टाकी बक्षीस म्हणून दिली. दुसऱ्या कूपनवर महिंद्रा विवो ट्रॅक्टर लागल्याचे सांगून ट्रॅक्टर इन्शुरन्सचे ३,५०००/- रुपये पहिले भरावे लागतील. त्यानंतर ट्रॅक्टर ताब्यात मिळेल, असे सांगून फिर्यादीकडून २०,०००/- रुपये रोख घेऊन १,५०००/- रुपये मोबाइल नं. ७३५०७६१३३३ यावर फोन पे करण्यास सांगून फिर्यादीस बक्षीस म्हणून लागलेला ट्रॅक्टर न देता फिर्यादीची फसवणूक केली. त्यावरून येवला तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता.

पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, तसेच मालेगाव अपर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या सूचनांनुसार व येवला तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली येवला तालुका पोलिस ठाण्याच्या तपास पथकातील पोलिस हवालदार दौलत ठोंबरे, गौतम मोरे यांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास करून व तांत्रिक माहितीच्या आधारे अनोळखी गुन्हेगाराबाबत गुप्त बातमीदार व जनसंपर्कातून माहिती मिळवून मुख्य आरोपी माणिक ज्ञानदेव घाडगे (वय ४१, रा. तनपुरे वाडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) यास राहते घरातून पळून जाताना पथकाने पाठलाग करून अटक केली. त्याचा एक साथीदार फरार आहे. संशयितावर मनमाड, ओझर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली कार हस्तगत केली आहे.

हेही वाचा  :

The post नाशिक : लकी ड्रॉमधून ट्रॅक्टरचे गिफ्ट लागल्याचे सांगून शेतकऱ्याची फसवणूक appeared first on पुढारी.