नाशिक : लखमापुर फाट्यावर शाॕर्ट सार्कीटने लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : लखमापुर फाट्यावर लखमापुर-परमोरी रस्त्यावर शाॕर्ट सर्कीटमुळे दोन दुकानांना भीषण आग लागल्याची घटना घडली. दुपारी दोन वाजताच्या सुमारास लागलेली आग उशिरापर्यंत विझविण्याचे काम अग्नीशमन दल करत होते.

याबाबत अधिक माहीती अशी की, लखमापुर परमोरी रस्त्यावरील जगदंबा हार्डवेअर व जगदंबा किराणा या दोन दुकानांना दुपारी दोन वाजताच्या सुमारास शाॕर्ट सर्कीटमुळे आग लागली. ललीत हिरण (रा. वरखेडा, ता.दिंडोरी) यांच्या मालकीचे ही दुकाने असुन दुपारच्या सुमारास जेवायला जात असताना दुकानात शाॕर्ट सार्कीट झाले. आग लागल्याचे समजताच दिंडोरी नगरपरीषद व पिंपळगाव ग्रामपालिका आणि ओझर येथील एच.ए.एलच्या अग्नीशमन वाहनांना ही माहीती देण्यात आली.

अग्नीशमन वाहने येईपर्यंत दुकानातील बहुतांशी वस्तु जळुन खाक झाल्या. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. आगीचे वृत्त समजताच विद्युत वितरण कंपनीचे उपविभागीय कार्यकारी अधिकारी, सपोनि निलेश बोडखे व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बघ्यांची गर्दी बाजूला करत वाहतुक सुरळीत केली. दरम्यान कडक उन व वाहाणारे वारे यामुळे आग पसरली होती. दुपारी पाच ते सहा पर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्नीशमन विभागाचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. दरम्यान या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पंचनाम्यानंतर दुकानातील तपशील व नुकसानीचा आकडा पुढे येईल अशी माहीती प्रशासनाने दिली. दरम्यान जगदंबा फर्निचर या दुकानाचेही किरकोळ नूकसान आगीत झाले. सदरच्या घटनेमुळे व्यावसायिक यांनी आपल्या दुकानातील वायरींगची तपासणी वेळोवेळी करुन घ्यावी जेणेकरुन असे धोके टाळण्यासाठी मदत होईल अशी माहीती उपकार्यकारी अभियंता सुनिल राऊत यांनी दिली.

The post नाशिक : लखमापुर फाट्यावर शाॕर्ट सार्कीटने लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक appeared first on पुढारी.