नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी

न्यायालय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्यास न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. रवीश प्रभाकर दुरगुडे (३५, रा. गावदेवी रोड, घाटकोपर, मुंबई) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८ या कालावधीत रवीशने अत्याचार केले. रवीश हा विवाहित असतानाही त्याने अविवाहित असल्याचे भासवून पीडितेशी संपर्क साधला. तिच्यासोबत खोटे बोलून लग्न करण्याचे आमिष दाखवून रवीशने दीपालीनगर परिसरात पीडितेवर अत्याचार केला.

हा प्रकार पीडितेच्या लक्षात आल्यानंतर तिने मुंबईनाका पोलिस ठाण्यात बलात्कार, फसवणुकीची फिर्याद दाखल केली. तत्कालीन पोलिस निरीक्षक पी. यु. शिंदे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे एस. एस. गोरे यांनी युक्तिवाद केला. साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी रवीशला शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस कर्मचारी एस. सी. भोये यांच्यासह न्यायालयीन अंमलदार पी. व्ही. पाटील यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा : 

The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्यास सात वर्ष सक्तमजुरी appeared first on पुढारी.