नाशिक : लग्नाच्या आमिषाने महिलेला फसवणाऱ्या “लखोबा’ला सात वर्षे कारावास

लग्नाचे आमिष,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लग्नाचे आमीष दाखवून महिलेस एक लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्यास न्यायालयाने सात वर्षे साधा कारावास व एक लाख २ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. यशवर्धन सुरेश देशमुख पाटील उर्फ स्वराज सुरेश देशमुख उर्फ सुमेश सुरेश पाेस्कर (३४, रा. ता. गुहागर, जि. रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, तिची यशवर्धनसोबत ओळख शादी डॉट कॉम संकेतस्थळावर झाली. लग्न करण्याची तयारी दर्शवल्याने यशवर्धनने पीडितेकडे स्वस्तात सोने घेऊ असे सांगून तिच्याकडून १ लाख ६०० रुपये घेतले. मात्र सोने दिले नाही किंवा लग्नही केले नाही. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात यशवर्धनविरोधात फसवणूकीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलिस निरीक्षक युवराज पत्की, सहायक पोलिस निरीक्षक प्रतिक पाटील, पोलिस शिपाई श्रीकांत कर्पे यांनी तपास केला. दरम्यान, पोलिसांनी यशवर्धन यास पकडून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात जलदगतीने सुनावणी झाल्याने परिस्थितीजन्य पुरावे व साक्षीदारांच्या आधारे अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतिभा पाटील यांनी यशवर्धनला शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड. सुनीता चिताळकर यांनी युक्तीवाद केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार प्रियंका गोसावी, व्ही. ए. नागरे यांनी कामकाज पाहिले.

आधुनिक ‘लखोबा’चे अनेक कारनामे

पोलिस तपासात यशवर्धन याने अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात भद्रकालीसह परजिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. आलिशान हॉटेलमध्ये काम करताना ओळखी वाढवून फसवणूक करत यशवर्धन फरार होत होता. अनेकांच्या नावे त्याने एटीएम कार्ड, सीमकार्ड वापरत असल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी यशवर्धन दर पंधरा दिवसांनी मोबाइल आणि सीमकार्ड बदलत होता. मात्र तरीदेखील पोलिसांनी त्यास पकडले.

हेही वाचा :

The post नाशिक : लग्नाच्या आमिषाने महिलेला फसवणाऱ्या "लखोबा'ला सात वर्षे कारावास appeared first on पुढारी.