नाशिक : लम्पी रोगाचा 10 गावांत 31 जनावरांना संसर्ग

लम्पी संसर्ग

नाशिक (घोटी) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील दहा गावांमध्ये लम्पी या संसर्गजन्य रोगाच्या साथीने आत्तापर्यंत 31 जनावरांना संसर्ग झाला आहे. पशुसंवर्धन विकास विभागाच्या वतीने प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक पातळीवर दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन आयुक्तांकडून स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींना तातडीने व्यापक जनजागृती व ग्रामपंचायत फंडातून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसे पत्र गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड यांच्यामार्फत स्थानिक पातळीवर देण्यात आले आहे. गोवंशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रतिबंध कामी व लक्षणे दिसू लागल्यास पशुधन विकास कार्यालय अथवा स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीस संपर्क करण्याचे आवाहन गटविकास अधिकारी गायकवाड यांच्याकडून करण्यात आले आहे. जनावरांना ताप येणे, नाक व डोळ्याद्वारे चिकट स्राव वाहणे, शरीरावर गाठी निर्माण होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, भूक मंदावणे, दुग्ध उत्पादन कमी होणे अशी लक्षणे दिसल्यास ती लम्पी संसर्गजन्य रोगाची असू शकतात. यावर प्रतिबंध करण्यासाठी गोठ्याची साफसफाई करणे, गोचीड, डास यांसह बाह्य कीटकांचे निर्मूलन करत मृत जनावरांचे योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याची गरज असते. याबाबत स्थानिक पातळीवर आदेश देण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ग्रामपंचायतींना प्रतिबंधात्मक उपायांचा विसर
लम्पी संसर्गजन्य रोगाची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांबाबत ग्रामपंचायतीकडून गटविकास अधिकारी गायकवाड यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. आदिवासी गावांमध्ये जनजागृती तसेच प्रतिबंधक उपाय म्हणून दिलेल्या सूचनांचा विसर स्थानिक ग्रामपंचायतींना पडल्याचे चित्र दिसत आहे.

या गावांमध्ये प्रादुर्भाव
बोरटेंभे, वासाळी, बेलगाव कुर्‍हे, काळुस्ते, साकुर, मालुंजे, दौंडत, कोरपगाव, नांदगाव बुद्रुक, टाकेद आदी ठिकाणी 31 जनावरांना लम्पी संसर्गजन्य रोगाची लागण झाली असून, त्यांच्यावर पशुधन विभागाकडून उपचार सुरू आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : लम्पी रोगाचा 10 गावांत 31 जनावरांना संसर्ग appeared first on पुढारी.