नाशिक : लष्कर हद्दीलगत बांधकामे करण्यास शिथिलता

बांधकाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लष्कर हद्दीलगच्या शंभर ते पाचशे मीटर अंतरातील भूखंडांवरील बांधकामाचा विषय मार्गी लागल्याच्या पाठोपाठ आता संरक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आता लष्कर हद्दीपासून फक्त पन्नास मीटर अंतराचा भूखंड सोडून उर्वरित पन्नास मीटर अंतरावरील भूखंडावर प्लाॅटधारकांना बांधकाम करता येणार आहे.

लष्कर हद्दीपासून शंभर मीटर अंतरावरील भूखंडधारकांनाही बांधकाम करण्यास परवानगी मिळावी यासाठी खा. गोडसे यांच्याकडून प्रयत्न सुरू होते. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लष्कल हद्दीलगतच्या हजारो शंभर मीटर आतील प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती खासदार गोडसे यांनी दिली. देवळाली लष्कर कमांडरने तीन वर्षांपूर्वी दिलेल्या पत्रान्वये तत्कालिन महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संरक्षण विभागाच्या हद्दीलगत असलेल्या शंभर मीटर हद्दीपर्यंत प्लॉटधारकांना कोणतेही बांधकाम करता येणार नाही. तसेच शंभर पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या प्लॉटधारकांना चार मजल्यांपर्यंतच बांधकाम करता येईल, असे आदेश काढले होते. या निर्णयामुळे संरक्षण विभागाच्या लष्कर हद्दीलगतच्या शेकडो प्लॉटधारकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. याची दखल घेत लष्कर कमांडरचा निर्णय बदलण्यासाठी खा. गोडसे प्रयत्नशील होते. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यातून लष्कर हद्दीलगतच्या शंभर ते पाचशे मीटर अंतरावरील भूखंडावर स्टील्ट न पकडता चार मजले किंवा पंधरा मीटर उंचीपर्यंतच्या बांधकामांना वर्षभरापूर्वी परवानगी मिळाली होती.

असे असले तरी लष्कर हद्दीपासून लगतच्या शंभर मीटरपर्यंतच्या भूखंडाबाबतचा निर्णय मात्र प्रलंबित होता. शंभर मीटरपर्यंत अंतरावरील भूखंडावर बांधकाम करण्याची परवानगी द्यावी यासाठी गेल्या वर्षभरात खासदार गोडसे यांनी संरक्षण मंत्रालयाकडे सततचा पाठपुरावा केला होता. लष्कर हद्दीपासून १०० मीटर अंतराच्या आतील भूखंडावर बांधकामाची अट काहीशी शिथिल करण्यात आली असून, यापुढे फक्त पन्नास मीटरचे अंतर सोडावे लागणार आहे. उर्वरित पन्नास मीटर अंतरावरील भूखंडावर प्लाॅटधारकांना बांधकाम करता येणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या या निर्णयामुळे लष्कल हद्दीलगतच्या हजारो शंभर मीटरच्या आतील प्लॉटधारकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : लष्कर हद्दीलगत बांधकामे करण्यास शिथिलता appeared first on पुढारी.