नाशिक : लहान मुलांच्या टोळीने स्कूटरच्या डिकीतून दोन लाख केले लंपास

मनमाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍याने स्कूटरच्या डिकीत बँकेतून काढून ठेवलेले दोन लाख रुपये शहरात चक्क लहान मुलांच्या एका टोळीने लंपास केले. बाजारपेठेत दुपारी गर्दीच्या वेळी घडलेल्या या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेचे सेवानिवृत्त कर्मचारी मुरलीधर देवकर आणि पत्नी यांनी दसर्‍याला दागिने आणि अन्य वस्तू खरेदीसाठी आज सकाळी महाराष्ट्र बँकेतील खात्यातून दोन लाख रुपयांची रक्कम काढली. ही रक्कम त्यांनी अ‍ॅक्टिव्हा स्कूटरच्या डिकीत ठेवली. दोघे शिवाजी चौकातून फुले चौकात आल्यानंतर स्कूटर रस्त्याच्या कडेला उभी करून खरेदीसाठी दुकानात गेले. तेथे काही वस्तू खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी देवकर यांनी बाहेर येऊन गाडीची डिकी उघडताच त्यात ठेवलेली दोन लाख रुपयांची पिशवी गायब झाल्याचे दिसताच त्यांना धक्का बसला. दुकानात जात पत्नीला डिकीतील रक्कम चोरीस गेल्याचे सांगताना त्यांना अक्षरशः चक्कर आली. दोन लहान मुले गाडीची डिकी उघडताना परिसरातील लोकांनी पाहिले होते. परंतु स्कूटर त्यांची असावी, या समजुतीतून कोणीही त्यांना हटकले नाही आणि लहान मुलांच्या या टोळीने डाव साधला. देवकर दाम्पत्यांच्या तक्रारीनंतर तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लहान मुलांची टोळी
लहान मुलांच्या टोळीतील काही जण बँकेच्या परिसरात फिरत असतात. एक-दोन जण पैसे काढणे, टाकण्याच्या बहाण्याने बँकेच्या आत जातात आणि कोणी किती रक्कम काढली याची माहिती घेऊन बाहेर असलेल्या इतरांना सांगतात. मोठी रक्कम काढणार्‍यांवर पाळत ठेवून ही टोळी त्यांचा पाठलाग करते.

हेही वाचा :

The post नाशिक : लहान मुलांच्या टोळीने स्कूटरच्या डिकीतून दोन लाख केले लंपास appeared first on पुढारी.