नाशिक : लाखांतील मांडूळ तस्करांवर सौदापार्टीचा गोळीबार

मांडूळ साप www.pudhari.news

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
लाखातील मांडूळ लाखोंत विक्रीच्या उद्देशाने मालेगावात आलेल्या दोघा तस्करांवर फिस्कटलेल्या सौद्यानंतर गोळीबार झाल्याची घटना सोमवारी (दि.13) रात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील झोडगे शिवारात घडली. याप्रकरणी दोन गुन्हे दाखल होऊन चौघांना अटक झाली असून, इतर संशयितांचा शोध सुरु आहे.

उमेश मधुकर जाधव (42, रा. कोरकेनगर, धुळे) यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली. त्याने कैलास मराठे याच्या मदतीने विष्णू (पूर्ण नाव माहीत नाही) याच्याकडून दोन महिन्यांपूर्वी दोन लाख रुपयांत मांडूळ विकत घेतले होते. त्याची विक्री 20 लाखांत होऊ शकते, तसे ग्राहक मालेगावात असल्याचे त्याला सांगण्यात आले. त्यानुसार उमेश व कैलास हे दोघे दरेगाव येथे संशयित शोएबच्या (पूर्ण नाव माहीत नाही) घरी आले. त्याने ग्राहक शोधण्याचे नाटक केले. सायंकाळ होऊनही ग्राहक न मिळाल्याने उमेश व कैलास हे दोघे मांडूळ घेऊन दुचाकीने धुळेकडे रवाना झाले. त्यांना महामार्गावरील शिवलिंग पेट्रोलपंपाजवळ सिराज शेख व मो. मन्सुर मो. बशिर यांनी थांबवले. त्यांच्यात चर्चा सुरू असतानाच पाठीमागून आलेल्या दोघांनी मांडूळ असलेली बॅग दे नाही तर शूट करू, असा दम दिला. याठिकाणी झटापट होऊन एकाने पिस्तुलातून गोळी झाडली. परंतु, ते बचावले. गोळीबाराचा आवाज ऐकून पेट्रोलपंपावरील कर्मचारी व नागरिकांनी धाव घेत हल्लेखोरांना ताब्यात घेतले. तालुका पोलिसांनी शोएब, सिराज शेख बशीर (रा. अक्सा कॉलनी, मालेगाव), इरफान ऊर्फ मोहंमद मन्सूर मोहंमद बशीर (रा. मालेगाव) यांना अटक केली असून, प्रमोद आहिरे (रा. हडसुणे, ता. धुळे), रामभाऊ (रा. पिलखोड, ता. चाळीसगाव), इमरान खान ऊर्फ सलमान खान हे फरार झालेत. तसेच पोलिस शिपाई रतिलाल वाघ यांनी फिर्यादी उमेश मधुकर जाधव (रा. कोरकेनगर, धुळे), कैलास रावण मराठे (रा. बाबरे, ता. जि. धुळे), प्रमोद नारायण आहिरे (रा. हडसुणे, ता. जि. धुळे), रामभाऊ (रा. पिलखोड, ता. चाळीसगाव), विष्णू (रा. सडगाव, ता. जि. धुळे) यांच्या विरोधात वन्यजीव मांडूळ तस्करी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. उमेशलाही अटक झाली. पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल कोळी तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : लाखांतील मांडूळ तस्करांवर सौदापार्टीचा गोळीबार appeared first on पुढारी.