
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये काम करण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडून लाच घेणार्या तिघा लाचखोरांपैकी दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कोठडी सुनावली असून, एकास न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आदिवासी विकासच्या बांधकाम विभागातील लाचखोर अभियंता दिनेशकुमार बागूल यांच्या कोठडीत दोन दिवसांची पुन्हा वाढ करण्यात आली आहे. तर सोमवारी (दि.29) लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या कळवण येथील आदिवासी विकासचा सहायक प्रकल्प अधिकारी प्रताप नागराथराव वडजे यास दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे.
हरसूलच्या सेंट्रल किचन बांधकामाच्या दोन कोटींच्या कंत्राटासाठी 28 लाखांची लाच बागूल यांनी मागितली होती. बागूल यांना त्यांच्या निवासस्थानी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विभागाने बागूल यांच्या तिडके कॉलनी व धुळ्यातील घरांमधून दीड कोटी रुपयांची रोकड जप्त केली. दरम्यान, बागूल यांना मंगळवारी (दि.30) तिसर्यांदा नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने बागूल यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे. या दरम्यान, बागूल यांच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती मागवण्यात आली आहे. बागूल यांच्या मालमत्तेचा तपास सुरू असून, राज्यातही इतर ठिकाणी त्यांची मालमत्ता असल्याचे समोर येत आहे. दुसर्या घटनेत कळवण येथील आदिवासी विकासच्या सहायक प्रकल्प अधिकारी वडजे यास सोमवारी (दि.29) 10 हजारांची लाच स्वीकारताना अटक झाली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्यांच्या घरझडतीमध्ये आक्षेपार्ह काही आढळले नाही. मात्र, त्यांच्या गैरव्यवहारांच्या तपासाकरिता विभागाने मुदत मागितली. अवघ्या चार दिवसांत आदिवासी बांधकाममधील दोन अधिकारी लाचखोरीमुळे विभागाच्या जाळ्यात फसले आहेत.
कुटुंबाशी अल्पसंवाद
बागूल यांच्या घरी धाड पडली तेव्हा, कुटुंबीय घरात नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यांची पत्नी व मुले परराज्यात राहत आहेत. यामुळे चौकशीत त्यांचे विशेष सहकार्य मिळत नसून, बागूलसोबतही त्यांनी फारसा संवाद या काळात साधलेला नसल्याचे समजते.
जीएसटीचे चव्हाणके कारागृहात
केंद्रीय वस्तू व सेवाकर विभागाचा (जीएसटी) अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके यांना सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी अटक केली होती. त्यांना तीन दिवसांची कोठडी मिळाल्यानंतर मुंबई मुख्यालयात चौकशी झाली. त्यांनी आठ हजारांची लाच स्वीकारल्यावर घरात दोन लाख रुपये आढळले. मात्र, चौकशीदरम्यान सीबीआयच्या हाती फार काही लागले नाही. यामुळे मंगळवारी (दि.30) चव्हाणके यांना नाशिक न्यायालयात हजर केल्यावर त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
हेही वाचा:
- नाशिकमधून अधिकाधिक सभासद नाेंदणी करण्याचा मनसेचा संकल्प
- पुणे : झोपडट्टीधारक जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले
- सातारा : बामणोली येथे बोट क्लबची अज्ञाताकडून तोडफोड, कार्यालय पेटवले (व्हिडिओ)
The post नाशिक : लाचखोरांचा मुक्काम कोठडीत ; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धडक कारवाईने नाशिक चर्चेत appeared first on पुढारी.