Site icon

नाशिक : लाचखोरांनी केली 60 टक्के ’तडजोड’

नाशिक : गौरव अहिरे
लाच घेणार्‍या शासकीय अधिकारी व कर्मचारी अवाच्या सव्वा लाच मागत त्यानंतर तडजोड करीत लाच घेत असल्याचे प्रकार नित्याचे घडत आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 1 जानेवारी 2021 ते 10 मार्च 2023 या कालावधीत केलेल्या कारवाईनुसार नाशिक परिक्षेत्रातील लाचखोरांनी तब्बल 2 कोटी 46 लाख 49 हजार 270 रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तडजोड करून त्यांनी तक्रारदारांकडून 98 लाख 50 हजार 390 रुपयांची लाच स्वीकारल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मागणीच्या रकमेत सुमारे 60 टक्के तडजोड करून लाचखोरांनी लाच घेतली. मात्र, लाच घेताना किंवा लाचेची मागणी करताना लाचखोर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहाथ सापडले आहेत.

चालू वर्षात 10 मार्चपर्यंत राज्यातील नाशिक परिक्षेत्रात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्वाधिक 37 सापळे रचून 54 लाचखोर पकडले आहेत. परिक्षेत्रातील नाशिकसह अहमदनगर, नंदुरबार, जळगाव व धुळे जिल्ह्यातील वर्ग एकचे 3, वर्ग 2 चे चार अधिकारी, वर्ग 3 चे सर्वाधिक 29 व वर्ग चारचे तीन कर्मचारी तसेच 15 इतर लोकसेवक किंवा खासगी व्यक्तींना लाच घेताना किंवा लाचेची मागणी करताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवायांमध्ये विधी व न्याय विभाग, राज्य उत्पादन शुल्क या दुर्लक्षित विभागांमधील लाचखोरांवर कारवाई झाली असून, भूमिअभिलेख-मधील वरिष्ठ अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना लाखो रुपयांची लाच घेताना पकडल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. त्याचप्रमाणे टोलनाक्यावर लाच घेतल्याप्रकरणीही कारवाई करण्यात आली आहे. या कारवायांमुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारींचा ओघ वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, विभागाने केलेल्या कारवाईनुसार लाचखोर सुरुवातीस मागणी करताना जादा रक्कम मागत असल्याचे आढळून आले आहे. मात्र, तडजोड करून ते स्वत: किंवा इतर लोकसेवक अथवा खासगी व्यक्तींमार्फत लाच घेत असल्याचे आढळून आले आहे. लाच मागण्यात, स्वीकारण्यात पोलिस विभागातील लाचखोर आघाडीवर असून, तडजोड करणार्‍यांमध्येही तेच लवचिक असल्याचे आढळून आले आहे. भूमिअभिलेखमधील लाचखोरही लाखांमध्ये लाचेची मागणी करत असल्याचे आढळून आले असून, या विभागातील लाचखोर तडजोडीतही आघाडीवर असल्याचे दिसते. तर महसूल विभागातील लाचखोर काहीसे ताठर असल्याचे आढळून आले आहे.

अशी झाली तडजोड
वर्ष                  मागणी                  स्वीकारलेली रक्कम                   तडजोडीची  टक्केवारी
2021              42,16,790                 22,78,240                              54.02%
2022              1,28,64,640              57,58,350                              44.76%
2023              75,67,840                18,13,800                               27.71%
एकूण              2,46,49,270              98,50,390                              39.96%

14 टक्के लाचेची रक्कम नाशिक परिक्षेत्रात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राज्यभरात केलेल्या कारवाईनुसार जानेवारी 2021 ते 9 मार्च 2023 या कालावधीपर्यंत केलेल्या कारवायांत 7 कोटी 11 लाख 94 हजार 340 रुपयांची लाच घेताना लाचखोरांना रंगेहाथ पकडले आहे. त्यापैकी नाशिक परिक्षेत्रातील लाचखोरांना 98 लाख 50 हजार 390 रुपयांची लाच घेताना पकडले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कारवाईपैकी 13.83 टक्के लाचेची रक्कम नाशिक परिक्षेत्रातील लाचखोरांनी घेतल्याचे समोर आले आहे.

The post नाशिक : लाचखोरांनी केली 60 टक्के ’तडजोड’ appeared first on पुढारी.

Exit mobile version