
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मनपाच्या नाशिकरोड, सिडको विभागीय कार्यालयांपाठोपाठ नाशिक पश्चिम विभागीय कार्यालयातील लाचखोरीच्या घटनांची आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी गंभीर दखल घेतली असून, मनपाच्या लिपीक प्रेमलता कदम यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच सेवा हमी कायद्याअंतर्गत येणाऱ्या ५३ सेवांचा दर आठवड्याला आढावा घेण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.
सेवा हमी कायद्याअंतर्गत दिलेल्या कालावधीत अर्जांचा निपटारा न करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही डॉ. पुलकुंडवार यांनी खातेप्रमुखांच्या आढावा बैठकीत दिला आहे. गेल्या साडेनऊ महिन्यांपासून मनपात प्रशासकीय राजवट सुरू आहे. यामुळे महापालिकेत नागरिकांची किरकोळ कामांसाठीदेखील अडवणूक केली जात असल्याने नागरिकही वैतागले आहेत. लोकप्रतिनिधी नसल्याने संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण राहिलेले नाही. नाशिकरोड विभागीय कार्यालयात हजेरी लावण्यासाठी लाच घेतल्याचे प्रकरण समोर आले होते. पाठोपाठ सिडको विभागीय कार्यालयात एका तांत्रिक अधिकाऱ्यास लाच घेताना एसीबीने अटक केली होती.
यानंतर नाशिक पश्चिम कार्यालयातील लिपीक प्रेमलता कदम यांना ५०० रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे मनपातील भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आली असून, त्याची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. आयुक्तांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत विभागीय अधिकारी व खातेप्रमुखांची कानउघडणी करत असे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला.
हेही वाचा :
- नगर : कांदा व्यापार्याची रोकड राहुरीतून लांबविली
- Maharashtra Assembly Winter Session २०२३ : विधिमंडळाचे पुढील अधिवेशन 27 फेब्रुवारीला मुंबईत
- गावठी पिस्तुल विक्रीसाठी आलेल्या एकाला माळेगाव पोलिसांकडून अटक
The post नाशिक : लाचखोरीच्या घटनेची आयुक्तांकडून गंभीर दखल; लिपिकाच्या निलंबनाचा प्रस्ताव appeared first on पुढारी.