नाशिक : लाचखोर खरेकडे आढळली मालमत्तेची कागदपत्रे, आज न्यायालयात हजर करणार

सतिश खरे ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांच्याकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास काही कागदपत्रे आढळून आली आहेत. आर्थिक व्यवहार व मालमत्तेसंबंधी कागदपत्रे असल्याचे समजते. दरम्यान, त्यांच्या बँक खात्यात ४३ लाख रुपये आढळून आले आहेत. खरे यांच्या पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी (दि.१९) संपत असल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

बाजार समितीच्या निवडणूक निकालात आक्षेप नोंदवल्यानंतर त्यावर सुनावणी घेऊन निकाल बाजूने लावण्याच्या मोबदल्यात खरे यांनी तक्रारदाराकडे ३० लाख रुपयांची लाच मागितली. लाचेची रक्कम कॉलेजरोड येथील निवासस्थानी घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खरे यांना रंगेहाथ पकडले. तर या गुन्ह्यात ॲड. शैलेश सुभद्रा यासही अटक केली. दरम्यान, पोलिस कोठडीत असताना खरे यांच्या निवासस्थानी सुमारे १६ लाख रुपयांची रोकड व ५४ तोळे वजनाचे साेन्याचे दागिने आढळून आले. बँक खात्यांमध्ये ४३ लाख रुपये आढळले. तसेच त्यांच्याकडे काही कागदपत्रे आढळली असून, त्यात मालमत्ता व आर्थिक व्यवहारांची माहिती असल्याचे समजते. दरम्यान, खरे यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून, त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : लाचखोर खरेकडे आढळली मालमत्तेची कागदपत्रे, आज न्यायालयात हजर करणार appeared first on पुढारी.