Site icon

नाशिक : लाचखोर जिल्हा निबंधक खरे याचे अखेर निलंबन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

30 लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी अटकेत असलेल्या जिल्हा उपनिबंधक संशयित सतीश खरेच्या ११ बँक खात्यांची तपासणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सुरू आहे. त्याचप्रमाणे इतर व्यवहारांचीही तपासणी केली जात आहे. बुधवारी (दि. १७) विभागाने खरेना विविध ठिकाणी नेत चौकशी केली. दरम्यान सहकार विभागानेही खरेच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.

बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर पद्धतीने निवडून आलेल्या उमेदवाराविराेधात सहकार विभागातील दावा खरेकडे होता. या दाव्याचा निकाल बाजूने लावण्याच्या मोबदल्यात त्याने ३० लाख रुपयांची लाच घेतली. या प्रकरणात अटक झाल्यानंतर खरे पोलिस कोठडीत असून बुधवारी त्यांच्या बँक खात्यांची माहिती तपासण्यात आली. त्यात ११ पैकी आठ खात्यांची तपासणी झाली असून, विभागाने सहकार कार्यालयातील कागदपत्रांचीही तपासणी केली. खरेचे लॉकर असल्याचेही समोर येत असून त्यांची तपासणी केली जात आहे.

खरेवर कारवाई झाल्यानंतर त्याच्याविरोधात तक्रारींचा पाढा वाचला जात असून निवेदन देण्यात आले आहे. त्यानुसार खरे याने बाजार समितीच्या सदस्यांकडून एका प्रकरणात ९३ लाख घेतल्याचा आरोप आहे. तसेच 10 बँकांवर प्रशासक नेमून आर्थिक लाभाचा कट रचल्याचे बोलले जात आहे.

ॲड. साभद्रांच्या सनदवर गंडांतर
संशयित खरेसोबत ॲड. शैलेश सुमतिलाल साभद्रा (३२, रा. गंगापूररोड) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेने वकिलांच्या आचारसंहितेचा भंग केल्यामुळे ॲड. साभद्रा यांच्या सनदवर गंडांतर येण्याची शक्यता आहे. याबाबत वकील परिषदेतर्फे पाठपुरावा सुरू आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : लाचखोर जिल्हा निबंधक खरे याचे अखेर निलंबन appeared first on पुढारी.

Exit mobile version