Site icon

नाशिक : लाचखोर मेजरसह एकास कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
ठेकेदाराकडून सव्वा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी सीबीआय-एसीबीच्या अटकेत असलेल्या लष्करातील मेजरसह कनिष्ठ अभियंत्याला जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी (दि. 14) न्यायालयीन कोठडी सुनावली. सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या सर्वच विभागांतील लाचखोरीचे लोण आता थेट संरक्षण दलापर्यंत पोहोचल्याने खळबळ उडाली आहे. लष्करातही गैरव्यवहार होऊ शकतात, यावर या प्रकरणामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील गांधीनगरच्या कॅट्स आवारात सीबीआयच्या नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे निरीक्षक रणजित पांडे, गजानन देशमुख, प्रेमकुमार जे. यांच्या पथकाने मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे मेजर तथा सहायक लष्करी अभियंता संशयित हिमांशू मिश्रा व कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडिले यांना एक लाख 20 हजारांची लाच स्वीकारताना अटक केली होती. या पथकाने रात्रीच दोघांची घरझडती घेत काही कागदपत्रे व पुरावे हस्तगत केली होती.

दरम्यान, सीबीआयकडून संशयितांना कोठडी देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. कामाच्या वादावरून वाद-विवाद झाल्यानंतर अधिकार्‍याला अडकवण्यासाठी तक्रारदाराने स्वतःहून ही रक्कम आणून दिल्याचा दावा संशयितांच्या वकिलांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने सीबीआय कोठडीची मागणी फेटाळून लावली. अखेर न्यायालयाने दोघाही संशयितांना 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर करत कारागृहात रवानगीचे आदेश दिले आहेत.

लष्कराकडून गंभीर
कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये (कॅट्स) झालेल्या गैरव्यवहाराची लष्कराने गंभीर दखल घेतली आहे. सैन्य अतिशय शिस्तबद्ध विभाग आहे. लाच प्रकरणाची अंतर्गत चौकशी करून दोषींविरोधात कारवाई केली जाईल. लष्कर सीबीआयला तपासात पूर्ण सहकार्य करणार असल्याचे पुणे येथील सैन्य दलाच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख महेश अय्यंगार यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : लाचखोर मेजरसह एकास कोठडी appeared first on पुढारी.

Exit mobile version