नाशिक : लाच घेणाऱ्या पोलिसाला दोन दिवसांची कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अपहरणाच्या गुह्याच्या तपासात वाहन आणि जेवणाच्या खर्चापोटी तक्रारदाराकडून सात हजारांची लाच घेणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षकाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सागर गंगाराम डगळे (३८) असे या पोलिसाचे नाव आहे. दरम्यान पथकाने संशयिताची घरझडती घेतली असून, त्यात अद्याप काही हाती लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. डगळे हे उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असून अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करीत होते.

या गुन्ह्यातील संशयिताच्या भावाकडे डगळेने लाचेची मागणी केली होती. त्यातील तीन हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने घेतले होते. या गुह्याच्या तपासासाठी पुणे येथे जावे लागणार असल्याचे सांगून डगळेने संशयिताच्या भावाकडे वाहन, जेवणाच्या खर्चापोटी लाच मागितली होती. बुधवारी (दि. 3) जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सापळा रचून डगळेला लाचेची रक्कम घेताना रंगेहाथ पकडले. न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : लाच घेणाऱ्या पोलिसाला दोन दिवसांची कोठडी appeared first on पुढारी.