Site icon

नाशिक : लाच प्रकरणी खरे यांना शुक्रवारपर्यंत पोलिस काेठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तीस लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (५८, रा. कॉलेजरोड) यांना शुक्रवार (दि.१९)पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या घरझडतीत खरे यांच्याकडे १५ लाख ८६ हजार रुपयांची रोकड व ३६ लाख रुपयांचे ५४ तोळे सोन्याचे दागिने सापडले. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे इतर स्थावर मालमत्तांची कागदपत्रेही आढळून आली आहेत. या प्रकरणात अटक केलेल्या शैलेश सुमतीलाल सुभद्रा (३२, रा. गंगापूर रोड) यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील एका बाजार समितीच्या निवडणुकीत कायदेशीर पद्धतीने निवडून आलेल्या संचालकाच्या विरोधात सहकार विभागात दाखल दाव्याचा निकाल लावण्याच्या मोबदल्यात खरे व ॲड. सुभद्रा यांनी तक्रारदाराकडून ३० लाख रुपयांची लाच मागितली. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावकर यांच्या आदेशानुसार सापळा रचून खरे यांना त्यांच्या निवासस्थानीच लाचेची रक्कम स्वीकारताना सोमवारी (दि.१५) रात्री पकडले. या प्रकरणात खरे यांना सहकार्य करणारे ॲड. सुभद्रा यांनाही पकडले. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला. खरेंच्या घरझडतीत रोकड व सोन्याचे दागिने आढळून आले. तसेच स्थावर मालमत्तेचेही कागदपत्रे आढळून आल्याने विभागाने ते जप्त केले आहेत. दरम्यान, दोघांनाही मंगळवारी (दि.१६) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने खरे यांना पोलिस कोठडी सुनावली, तर ॲड. सुभद्रा यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

जिल्ह्यातच मुक्कामामुळे दबदबा

खरे यांनी नाशिक जिल्ह्यातच सेवा बजावल्याचे समोर येत आहे. बदली होत नसल्याने त्यांनी दबदबा निर्माण केल्याची चर्चा कमचाऱ्यांमध्ये रंगली आहे.

निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेशाचे स्वप्न

खरे हे पाच महिन्यांनी सेवानिवृत्त होणार होते. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी तयारी केल्याचे समोर येत आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघात ते नशीब आजमवणार असल्याचे बोलले जात आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतरही त्यांची ही इच्छा कायम असल्याचे त्यांच्या बोलण्यातून समोर आली.

दाव्याबाबत संशय

बाजार समितीच्या निकालानंतर निकालावर लगेचच आक्षेप घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यावेळी निकालावर आक्षेप घेण्यात आला नाही. निकाल देण्याच्या मोबदल्यात निवडून आलेल्या संचालकांकडे ३० लाखांची लाचेची मागणी केल्याचे तपासात समोर येत आहे. त्यामुळे दाव्याचा डाव रचण्यामागे नेमका सूत्रधार कोण, याचा पोलिस तपास करत आहे.

टक्केवारी टाळण्यासाठी स्वत: लाच स्वीकारली

तक्रारदाराच्या दाव्यावरील सुनावणी खरेंनी पूर्ण केली. लाचेचे ३० लाख रुपये मिळाल्यानंतरच निकाल देईल, असे चौकशीत समोर आले आहे. सोमवारी सायंकाळी खरेंनी तक्रारदारास निवासस्थानी येऊन पैसे देण्यास सांगितले. या गुन्ह्यातील दुसरा संशयित ॲड. शैलेश सुभद्रा (३२,रा. उर्वी अपार्टमेंट, गंगापूर रोड) याने पैसे घेतले तर त्यास टक्केवारी द्यावी लागेल, हे टाळण्यासाठी खरेंनी स्वत:च लाचेचे पैसे स्वीकारल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीतून समोर येत आहे.

याआधीही सापळा

बाजार समितीच्या निवडणुका सुरू असतानाही खरेंनी एकाकडे पैशांची मागणी केल्याचे समजते. मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात फसण्याच्या शक्यतेने खरे सावध झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारदार येत नसल्याने खरे जाळ्यात अडकले नव्हते. अखेर तक्रार मिळताच विभागाने सापळा रचून खरेंना रंगेहाथ पकडले.

आलिशान कार, फ्लॅट

खरे यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा-मुलगी असे सदस्य आहेत. त्यांच्याकडे दोन आलिशान कार, कॉलेजरोडवर फ्लॅट, सटाणा येथे घर असून तेथेही झडती घेण्यात आली.

हेही वाचा : 

The post नाशिक : लाच प्रकरणी खरे यांना शुक्रवारपर्यंत पोलिस काेठडी appeared first on पुढारी.

Exit mobile version