Site icon

नाशिक : लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी की… गैरसोयीसाठी? काय आहे नक्की ब्रीदवाक्य

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य मिरविणार्‍या एसटीच्या लासलगाव बस आगाराच्या बसेसमधून प्रवास करताना ‘प्रवाशांच्या गैरसोयीसाठी…’ जणू असे ब्रीदवाक्य झाले आहे. लासलगाव बस आगाराची चालू गाडी कधी बंद पडेल आणि खाली उतरून धक्का मारावा लागेल आणि तोंडातून शब्द बाहेर येतील, चल… यार… धक्का… मार… अशीच काहीशी अवस्था आहे. लासलगाव बस आगारात जेमतेम 38 गाड्या असून त्या सर्व 15 वर्षे जुन्या असल्याने चालक-वाहकांकडून कशाबशा चालविल्या जातात.

आशिया खंडातील नावाजलेली कांदा बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या लासलगावातील बस आगारात 88 चालक व 75 वाहक आहेत, परंतु येथे केवळ 38 बस गाड्या उपलब्ध आहेत. 38 गाड्यांपैकी दररोज 3 ते 4 गाड्या बंद अवस्थेत असतात, तर अनेक गाड्या बाहेरगावी गेल्यावर मध्येच कुठेतरी बंद पडतात. अशा घटनांमुळे आगाराच्या बस गाड्यांमध्ये प्रवासी बसण्यास पसंती देत नाहीत. गेल्या चार महिन्यांपासून लासलगाव आगारप्रमुख हे पद रिक्त असून तात्पुरत्या स्वरूपात प्रभारी पदभार अन्य अधिकार्‍याकडे देण्यात आलेला आहे. तर बसची दुरुस्ती करणारा विभाग म्हणून ओळख असलेल्या कार्यशाळा अधीक्षक हे पद सुमारे वर्षभरापासून रिक्त आहे. लासलगाव आगाराला गेल्या सात वर्षांपासून एकही नवीन गाडी उपलब्ध झालेली नाही. आगारात बस संख्या कमी असल्याने अनेक जवळच्या फेर्‍या रद्द होतात. संध्याकाळी चांदवडहून येणार्‍या विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत. पूर्वी 20 ते 25 फेर्‍या चांदवडसाठी केल्या जायच्या. मात्र सध्या फक्त 10 फेर्‍या सुरू आहेत.

बस वर्कशॉपमध्ये कर्मचार्‍यांची कमतरता…
आगाराच्या बसेस दुरुस्त करण्यासाठी कागदोपत्री 45 कर्मचारी असले, तरी सध्या केवळ 22 कर्मचार्‍यांवर हे काम सुरू आहे. 23 कर्मचारी सेवानिवृत्त झालेले असताना त्यांच्या जागी नवीन कर्मचारी नेमण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बस भर रस्त्यात बंद पडल्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.

प्रवासी अन् कर्मचार्‍यांना पाणी नाही…
लासलगाव बस आगारात पाणपोईची निर्मिती करण्यात आलेली असली, तरी ती बंद आहे. बस कर्मचार्‍यांना लासलगाव स्थानकात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही, तर बंद असलेले पंखे, रंगरंगोटी झालेली नसल्याने प्रवासी बसस्थानकात येण्याऐवजी खासगी वाहनाने प्रवास करण्यास पसंती देत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : लालपरी प्रवाशांच्या सेवेसाठी की... गैरसोयीसाठी? काय आहे नक्की ब्रीदवाक्य appeared first on पुढारी.

Exit mobile version