नाशिक : लाळ्या खुरकुत रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जनावरांचे होणार लसीकरण

जनावरांचे लसीकरण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

उन्हाळा सुरु झाल्यानंतर जनावरांना होणाऱ्या लाळ्या खुरकत रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी पशुसंवर्धन आयुक्तालयामार्फत मार्च महिण्यात लस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यातील सव्वा ११ लाख जनावरांचे लसीकरण यामध्ये होणार असल्याची माहीती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ विष्णू गर्जे यांनी दिली आहे.

सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागांत लाळ्या खुरकुताच्या साथी येतात. लाळ्या खुरकुत रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. या विषाणूजन्य आजारामुळे दुभत्या जनावरांचे दुधाचे उत्पादन कमी होण्यासह जनावरे लंगडू लागतात.हा रोग खूर विभागलेल्या जनावरांना होतो. हा रोग प्रामुख्याने सांसर्गिक पाणी व खाद्य खाल्ल्याने होतो. जिल्ह्यात ८ लाख ९५ हजार ५० गोवर्गीय जनावरे असून २ लाख २१ हजार २३४ म्हैसवर्गीय जनावरे आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेची सध्या २४४ केंद्रे असून त्या केंद्रांवर ही लस मार्च महिन्यात उपलब्ध होऊ शकणार आहे. प्रामुख्याने मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात ही लस उपलब्ध होईल. त्यानंतरच लसीकरण प्रक्रीयेला प्रारंभ होणार आहे.

ही आहेत आजाराची लक्षणे

– जनावरांचे खाणे- पिणे बंद होते.

– जनावरांस ताप येतो.

– दुधाळ जनावरांत दूधउत्पादनात घट येते.

– जनावरांच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात.

– जनावरांच्या तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते.

– पुढील पायांमध्ये खुरातील बेचकीध्ये फोड येतात.

– जनावरांना मागील पायांत फोड तयार झाल्यास अपंगत्व येते.

हेही वाचा :

The post नाशिक : लाळ्या खुरकुत रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी जनावरांचे होणार लसीकरण appeared first on पुढारी.