Site icon

नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक

नाशिक (पिंपळगाव मोर /सर्वतीर्थ टाकेद) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यात खेड भैरव येथे खरीप हंगामात मोहन रामनाथ वाजे या शेतकर्‍याने दप्तरी 1008 वाण असलेले बियाणे खरेदी केले. 145 दिवसांत निघणारी दफ्तरी कंपनीचे 1008 वाणाचे भात बियाणे शेतकर्‍यांनी खरेदी करत लागवड केली खरी मात्र हे पीक निसवले पण त्याला कुसळ असलेले लोंबट आले.

लागवड केलेले क्षेत्र 1 हेक्टर असून त्यामुळे मोहन वाजे या शेतकर्‍यांची संपूर्ण मेहनत वाया जाऊन लागवडीचा खर्च संपूर्ण पाण्यात गेल्याने संबंधित शेतकर्‍यांची फसवणूक झाली आहे. शेतकरी मोहन वाजे या शेतकर्‍याने कृषी विभाग व संबंधित भात बियाणे कंपनीला दुकानदारामार्फत कळविले असता कंपनीने कुठलीही दखल घेतली नाही. कृषी विभागाने शेतकर्‍याच्या शेतात येऊन पाहणी केली व तसा अहवालदेखील दिला व झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला पण भात बियाणे कंपनीने शेतकर्‍याच्या झालेल्या नुकसानीकडे ढुंकूनही बघितले नाही. दफ्तरी कंपनीने आपली फसवणूक केली असल्याचे शेतकर्‍यांच्या निदर्शनात आले आहे.

बियाणे कंपनीकडून फसवणूक झाल्याने शेतकर्‍यांनी कृषी अधिकार्‍याकडे तक्रार दिली असून दप्तरी कंपनीवर कृषी विभागामार्फत चौकशी करून कारवाई करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकरी मोहन वाजे यांनी केली आहे. कृषी विभाग व दप्तरी कंपनीच्या अधिकार्‍यांनी संबंधित शेतकर्‍याच्या शेतावर येऊन पाहणी केली. परंतु कृषी विभागाचे अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, कृषी विद्यापीठ प्रतिनिधी सुरेश परदेशी, कृषी अधिकारी पंचायत समिती के. एल भदाणे, कृषी सेवा विक्रेता रमेश वाजे यांनी भेट दिली असता तक्रार निवारण समितीने पंचनामा करून अहवाल तयार केला. अहवालात म्हटले आहे की लागवड केलेली दप्तरी 1008 हे संपूर्णपणे कुसळी भात आले यात भाताचे दाना भरीव नाही असल्याचे नमूद केले. परंतु झालेल्या नुकसानीकडे दप्तरी कंपनीच्या कर्मचार्‍यांनी कुठलीही दखल घेतली नाही. त्यामुळे शेतकर्‍याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी मोहन वाजे व शेतकर्‍यांनी तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे. यावेळी कैलास वाजे, मनोज वाजे, भगवान वाजे, किशोर वाजे, राघू कचरे आदी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

संबंधित कंपनीने माझी फसवणूक केल्यामुळे माझा लागवडीचा खर्च वाया गेला. झालेल्या नुकसानीची पहाणी कृषी विभागाने केलेली असून संबंधित कंपनीवर कारवाई करून मला न्याय मिळणे गरजेचे आहे. जर सदर संबंधित कंपनीने माझी झालेली नुकसानभरपाई दिली नाही तर येत्या काही दिवसांत मी आमरण उपोषण करून न्याय मागेल. यासोबतच जिल्हाधिकारी यांच्यापासून ते राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांकडे जाऊन दाद मागेल.          – मोहन वाजे, नुकसानग्रस्त शेतकरी, खेड भैरव.

हेही वाचा:

The post नाशिक : लावले भात, उगवले कुसळ; बियाणे कंपनीकडून फसवणूक appeared first on पुढारी.

Exit mobile version