नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम

len cutting www.pudhari.news

नाशिक : गौरव अहिरे
मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर होणार्‍या अपघाती मृत्यूंना रोखण्यासाठी शहर पोलिसांनी गस्त सुरू केली आहेे. या गस्ती पथकांमार्फत अवजड वाहनांना एकाच लेनमध्ये वाहने चालविण्याचे आवाहन केले जात असून, इतर वाहनांना ओव्हरटेक करण्यासाठी दुसर्‍या लेनचा वापर करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे या गस्तीचा सकारात्मक परिणाम दिसत आहे. गत तीन महिन्यांच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये निम्म्याने घट झाली आहे.

नाशिक शहरात सर्वाधिक अपघाती मृत्यू शहरातून गेलेल्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर झाले आहेत. शहरात 30 किमी लांबीचे महामार्ग असून, त्यावर शहरवासीयांसह बाहेरील वाहनांचीही ये-जा असते. त्यात अवजड वाहनांचाही समावेश असून, त्यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे बोलले जाते. पोलिसांच्या आकडेवारीनुसार महामार्गांवर दरवर्षी सरासरी 60 ते 70 जणांचा अपघाती मृत्यू होत होता. त्यामुळे महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी गस्त सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जुलै महिन्यात मुंबई-आग्रा महामार्गावर ‘लेन कटिंग’ बंद करण्याचे आदेश देत लेन कटिंग करू नये, असे आवाहन करण्यासाठी वाहतूक विभागाचे गस्ती वाहने सुरू झाली. अवजड वाहनचालकांना लेन कटिंग न करण्याचे आवाहन या वाहनांमार्फत केले जात आहे, तर इतर वाहनांनाही लेनचे नियम पाळण्यास सांगितले जात आहे. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसत असल्याने नाशिक – पुणे महामार्गावरही त्याची अंमलबजावणी सुरू झाली. यासाठी पोलिसांना मनुष्यबळ व वाहनांची गरज असून त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. गस्तीसाठी किमान 16 वाहनांची आवश्यकता असून त्यासाठी पाठपुरावा केला जात आहे.

‘लाइट बॅटन’द्वारे वाहनचालकांना मार्गदर्शन
पोलिस आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबई – आग्रा महामार्गावर मार्चपर्यंत आठ अपघाती मृत्यू झाले, तर एप्रिल ते जुलैमध्ये 11 जणांनी प्राण गमावले. मोहीम सुरू झाल्यानंतर अपघाती मृत्यूंची संख्या निम्म्याने घटली असून, अपघातही कमी झाले आहेत. 19 जुलैपासून सुरू झालेल्या मोहिमेत ‘लाइट बॅटन’द्वारे वाहनचालकांना मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी चार पथके कार्यरत असून, ते दुपारी 3 ते रात्री 10 आणि मध्यरात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत गस्त घालतात.

महामार्गांवरील तुलनात्मक आकडेवारी अशी…
अपघातांचे स्वरूप           जानेवारी ते मार्च       एप्रिल ते 18 जुलै         19 जुलै ते ऑक्टोबर अखेर
मृत्यू                                    8                           11                                     6
गंभीर                                   3                           11                                     6
किरकोळ                               1                             1                                     3
एकूण                                  12                          23                                    15

हेही वाचा:

The post नाशिक : लेन कटिंग रोखल्याने अपघातांत निम्म्याने घट; पोलिसांच्या गस्तीचा सकारात्मक परिणाम appeared first on पुढारी.