Site icon

नाशिक : वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून का केला? धक्कादायक कारण आलं समोर

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

वडील आणि मुलीमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात वडिलांनी मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना अंबडजवळील चुंचाळे परिसरातील रामकृष्णनगर येथे घडली. ज्योती रामकिशोर भारती (२३) असे मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी संशयित रामकिशोर अवधूप्रसाद भारती (४५) यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्णनगर भागात रामकिशोर भारती शिवव्हिला अपार्टमेंटमध्ये राहात होते. मंगळवारी (दि. 17) सकाळी 10च्या सुमारास त्यांचा ज्योतीबरोबर जोरदार वाद झाला. रागाच्या भरात रामकिशोर यांनी ज्योतीचे तोंड दाबून तिला ठार मारले. नंतर परिसरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर मृत ज्योतीला त्यांनी घरी आणत तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचा बनाव केला. अंबड पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक पोलिस आयुक्त सोहेल शेख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार हे घटनास्थळी आले. त्यांना संशय येताच त्यांनी पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर रामकिशोर यांनी तोंड दाबून मारल्याची कबुली दिली. अंबड पोलिसांनी रामकिशोर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

मृत ज्योती पदवीचे शिक्षण घेत होती. तिचे वडील हे मूळ उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून ते गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आहे. अंबड एक्स्लो पॉइंट या ठिकाणी त्यांचे स्वतःचे लहान युनिट आहे. त्यांना दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे. अन्य दोघे भावंडे अकरावी तसेच बारावीचे शिक्षण पूर्ण करत आहेत.

प्रेमप्रकरण हेच भांडणाचे कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीचे एका मुलावर प्रेम होते. यावरून वडिलांचे नेहमी तिच्याशी भांडण व्हायचे. दीड महिन्यानंतर तिचे लग्न करायचे असे कुटुंबाने ठरविले होते. परंतु तरीही ती सतत त्या मुलाला भेटण्याचा प्रयत्न करायची. याच कारणावरून आज जोरदार वाद झाला. दीड महिन्यापूर्वी तिने फिनेल पित आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ती वडिलांना सतत आत्महत्या करण्याच्या धमक्या द्यायची, असे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून का केला? धक्कादायक कारण आलं समोर appeared first on पुढारी.

Exit mobile version