नाशिक : वणी परिसरात पावसाने कांदा-टोमॅटो उद्ध्वस्त

www.pudhari.news

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
शिवारातील मुळाणे, बाबापूर, भातोडा, धरमबर्डा या गावांना पावसाने झोडपल्याने शेकडो हेक्टर जमिनीवर पिकांची नासाडी झाली आहे. शुक्रवारी (दि. 5) दुपारी 3 पासून अडीच तास जोरदार पाऊस झाल्याने शेतातील टोमॅटो, कांदा रोपे वाहून गेली.

काही दिवसांपूर्वी अतिशय समाधानकारक पाऊस पडला होता. मध्यंतरी पाऊस उघडला होता. शेतीच्या कामांना चांगला वेग आला होता. हा हंगाम टोमॅटो लागवडीचा असल्याने टोमॅटो लागवड जोरात सुरू होती. त्यासाठी रोपे तयार केलेली होती. तसेच कांदा रोपेही तयार करण्यात आली होती. अचानक दुपारी दोन-तीन तास जोरदार पाऊस पडताच अनेक भागांतील लागवड केलेले टोमॅटो, कांदा आदी पिकांची रोपे मोठ्या प्रमाणात वाहून गेली. सोयाबीन, भातही बर्‍याच प्रमाणात वाहून गेल्याने या भागातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. हरी राऊत, बापू गायकवाड, भीमराज गायकवाड, सीताराम पालवी, अमृता गायकवाड, वामन राऊत, शशिकांत बागूल, भगवान बागूल, कांतीलाल पालवी, उत्तम पालवी यांचे मोठे नुकसान झाले. मुळाणे, बाबापूर, भातोडे, धरमबर्डा या भागांत टोमॅटो व कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सप्तशृंगगड, मार्कंडेय डोंगरावर जोरदार पाऊस झाल्याने या डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या गावात नदी-नाल्यांना मोठा पूर आला.  यात अनेकांच्या शेतातील माती पिकांसह वाहून गेली. तहसीलदारांनी त्वरित पंचनामे करून नुकसानभरपाईचे प्रस्ताव तयार करीत शासनाला पाठवावेत, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : वणी परिसरात पावसाने कांदा-टोमॅटो उद्ध्वस्त appeared first on पुढारी.