नाशिक : वणी येथे बस चालकावर धारदार शस्त्राने वार

वणी; पुढारी वृत्तसेवा : वणी येथे बस चालकाला अडवून दादागिरी करत धारदार शस्त्राने हातावर वार केल्याची घटना घडली. नाशिक येथे घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. या घटनेत चालकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, नाशिक येथून सांय.४ वाजाताच्या दरम्यान (एम एच ४० वाय ५९८५) ही बस घेऊन चालक अनुप कारभारी खैरनार (वय ३८ रा.मानुर) हे कळवणकडे जात होते. वणी येथील शंखेश्वर मंदिराजवळ या बसच्या समोर अचानकपणे एक कार येऊन उभी राहिली. (एम एच १५ एच एच ४८७१) या नंबरच्या या संबंधित कारचा चालक महेंद्र प्रभाकर पाटील याने बस थांबवून चालकाला दादागिरी केली. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली. दरम्यान महेंद्र पाटील याने कार मधून धारदार शस्त्र काढून अनुप खैरनार यांच्यावर वार करत मारहाण केली. या झटापटीत खैरनार यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. बस वाहक दिगंबर कवर हे सोडवायला गेले असता त्यांच्या देखील हाताच्या आंगठ्याला दुखापत झाली.

यावेळी वणीकडून नाशिककडे जात असलेल्या शीघ्र कृती दलाचे जवान यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी देखील महेंद्र याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदर इसम नशेत असल्याने कोणालाच ऐकत नव्हता. शीघ्र कृती दलाच्या जवानांनी त्याला पकडून त्यांच्या हातातील शस्त्र हिसकावून घेतले. ही घटना समजताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महेंद्र याला वणी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.

वणी पोलीस ठाण्याचे सपोनि स्वप्निल राजपुत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत महेंद्र पाटील याला अटक केली. अनुप खैरनार यांच्या तक्रारीवरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

हेही वाचा

The post नाशिक : वणी येथे बस चालकावर धारदार शस्त्राने वार appeared first on पुढारी.