नाशिक : ‘वनरार्ई’ने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ

वनराई www.pudhari.news

नाशिक (सर्वतीर्थ टाकेद) :  पुढारी वृत्तसेवा
सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत हद्दीतील घोडेवाडी शिवारात इगतपुरी तालुका कृषी विभाग, स्वदेश संस्थेच्या संकल्पनेतून व भक्तराज जटायू गाव विकास समितीच्या सौजन्याने ग्रामस्थांच्या सहभागातून नदी नाले, ओहळ क्षेत्रात वनराई बंधारे बांधून ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात येत आहे. वनराई बंधार्‍यांमुळे परिसरातील बोअरवेल, विहीर, ओहोळ यात मुबलक पाणी साचून राहणार आहे.

आदर्श शेतकरी पुरस्कार सन्मानित शेतकरी जगन घोडे, कृषी पर्यवेक्षक पवार, कृषी सहायक जयश्री गांगुर्डे, कृषी सहायक अशोक राऊत, बायफचे संजय थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रामस्थांच्या श्रमदानातून या बंधार्‍यांची निर्मिती होत आहे. या उपक्रमामुळे गाव परिसरातील सिंचन क्षेत्राचा विकास होणार आहे. यंदा इगतपुरी तालुक्यात सरासरीपेक्षा दहापट जास्त पाऊस झाल्याने पाण्याची मोठी उपलब्धता निर्माण झाली आहे. मात्र पावसाळा गेला की, पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. दरम्यान, घोडेवाडी शिवारात कृषी विभाग व बायफ यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून वनराई बंधारा तयार आल्यानंतर अडवलेले पाणी बघून शेतकरी वर्गाच्या चेहर्‍यावर समाधान होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राम शिंदे, शेतकरी काळू जोशी, पांडुरंग निगळे, अनिल निगळे, लक्ष्मण गभाले, साहेबराव जोशी, संगीता धादवड, संजना घोडे, अनिता गभाले, भक्तराज जटायू गाव विकास समिती आदींसह शेतकरी उपस्थित होते.

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नद्या, नाले, ओहोळ कोरडे ठाक होतात. परंतु वनराई बंधार्‍यांमुळे यंदा सर्वत्र पाणी साचून आहे. याचा फायदा रब्बी हंगामात होत आहे. यासोबतच मुक्या प्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. – काळू जोशी, शेतकरी.

हेही वाचा :

The post नाशिक : ‘वनरार्ई’ने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ appeared first on पुढारी.