नाशिक : वर्षभरात सावकारांविरोधातील ४० पैकी आठच तक्रारी निकाली

खासगी सावकारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून सातपूर येथे पिता-पुत्रांनी आपले जीवन संपविल्याची घटना घडल्या नंतर खासगी सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सावकारांविरोधात गेल्या काही दिवसांत चारहून अधिक गुन्हे दाखल झाले आहेत. तर उपनिबंधकांकडे वर्षभरात सावकारांविरोधात ४० तक्रारी आल्या आहे. सावकारांनी कर्जाच्या मोबदल्यात भरमसाट व्याज घेऊनही स्थावर मालमत्ता बळकावल्याच्या या तक्रारी असून, त्यातील आठच तक्रारींचा निपटारा झाला आहे.

शहरासह जिल्ह्यात खासगी सावकारांचे पाळेमुळे घट्ट रुजल्याचे चित्र आहे. सावकारांकडून कर्ज घेतल्यानंतर व्याजापोटी १० ते १५ पट परतावा देऊनही कर्जाची मूळ मुद्दल तशीच राहत असल्याने कर्जदार हवालदिल होतात. त्यातच काही सावकार दमदाटी करून कर्जदारांकडील मालमत्ता परस्परविक्री करून किंवा स्वत:च्या नावे करत असल्याने कर्जदाराचे अतोनात नुकसान होते. त्यामुळे काही कर्जदारांनी आत्महत्या केल्या आहेत, तर काहींनी मालमत्तांवरील हक्क सोडत सावकारांच्या तावडीतून सुटका केली आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, नोंदणीकृत किंवा अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात तक्रार आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाते. त्यात सावकारांनी कर्जदारांच्या स्थावर मालमत्तांवर मालकी हक्क सांगितल्यास किंवा मालमत्तांचा व्यवहार केल्यास उपनिबंधक कार्यालयाकडून शहानिशा करून कारवाई केली जाते. उपनिबंधक सतीश खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ४० कर्जदारांनी सावकारांविरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यातील तक्रारींची शहानिशा केली जात आहे. त्यापैकी एका तक्रारदार शेतकऱ्याकडील शेती नोंदणीकृत सावकाराने बळकावली होती. चौकशीनंतर सावकाराचा परवाना रद्द करीत शेतीचा मालकीहक्क पुन्हा शेतकऱ्यास दिला आहे. तर तीन तक्रारदारांनी त्यांचा तक्रार अर्ज मागे घेतला आहे. त्याचप्रमाणे इतर तक्रारींची चौकशी सुरू असून, त्याबाबतही तक्रारदार न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नोंदणीकृत सावकारांना दिलेल्या परवान्यानुसार त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच सावकारी करता येते. मात्र, अनेक सावकार कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्याच्या परवान्यावर सावकारी करणे, नियमबाह्य व्याजदर लावणे, नियमबाह्य मालमत्ता गहाण ठेवल्यासही सावकारांवर कारवाई केली जात असते. त्याचप्रमाणे सावकारांविरोधात आलेल्या काही तक्रारी या खोट्या स्वरूपात असल्याचेही उपनिबंधक कार्यालयाने सांगितले.

१५ लाखांच्या कर्जात दीड कोटीची शेती बळकावली

चांदवड तालुक्यातील एका शेतकऱ्याने नाशिकमधील सावकाराकडून १५ लाखांचे कर्ज घेतले होते. मात्र, सावकाराने कर्जाच्या मोबदल्यात शेतकऱ्याकडून दीड कोटी रुपयांच्या शेतीवर मालकी हक्क सांगितला. त्यामुळे शेतकऱ्याने उपनिबंधकांकडे तक्रार केली. या तक्रारीवर सुनावणी झाल्यानंतर सावकाराने अवैध मार्गाने शेतीवर कब्जा घेतल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधित शेतकऱ्यास त्याच्या शेतीचा मालकी हक्क परत करण्यात आला, तर सावकाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे.

सावकारांविरोधात कोणीही तक्रार करू शकतो. तक्रारदाराची ओळख सांगितली जाणार नाही. तक्रार आल्यानंतर संबंधितांची चौकशी करून त्यात दोषी आढळून आल्यास संबंधित सावकारावर कारवाई केली जाते.

– सतीश खरे, जिल्हा उपनिबंधक, नाशिक

हेही वाचा :

The post नाशिक : वर्षभरात सावकारांविरोधातील ४० पैकी आठच तक्रारी निकाली appeared first on पुढारी.