Site icon

नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे

नाशिक (सिन्नर/तळेगाव) : पुढारी वृत्तसेवा
अवकाळी पाऊस, गारपीट, वाढते ऊन यास निसर्गाचा होणारा र्‍हास कारणीभूत मानला जातो. यावर वृक्षारोपण हा अतिशय प्रभावी उपाय आहे. ही काळाची गरज ओळखून नाशिकचे जलसंधारण अभियंता हरिभाऊ गिते आणि संरक्षण मंत्रालयाचे शास्त्रज्ञ डॉ. एल. के. गिते यांच्या कल्पनेतून पुतण्याच्या लग्नात वर्‍हाडींना 1 हजार 111 केशर आंबा रोपाचे वाटप करत वृक्षारोपण करण्याचा संदेश दिला.

संगमनेर तालुक्यातील प्रगतशील शेतकरी आणि कारभारी गिते शिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब कारभारी गिते यांचे चिरंजीव तुषार व सिन्नर तालुक्यातील पाटोळे येथील सोमनाथ कराड यांची कन्या शोभा या उच्चशिक्षित नवदाम्पत्याचा विवाहसोहळा नांदूरशिंगोटे येथे झाला. यानिमित्ताने वृक्षारोपणाचा संदेश गावागावात पोहोचवावा हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून गिते परिवाराने आलेल्या वर्‍हाडी मंडळीना केशर आंब्याचे एक रोप भेट देऊन त्याचे संगोपन करण्याचा संदेश दिला. माजी महसूल मंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार सुधीर तांबे, राजाभाऊ वाजे, इंद्रभान थोरात, युवा नेते उदय सांगळे आदींसह सर्वच मान्यवरांनी, वर्‍हाडी मंडळींनीया अभिनव उपक्रमाचे कौतुक केले.

खर्चिक प्रथा थांबवण्यास सहाय्य मिळेल : गिते
हातात आंब्याचे रोपटे घेऊन घरी जाणारा आनंदी वर्‍हाडी पाहून विवाहसोहळ्यात खरा आनंद लाभला अशी भावना अभियंता हरिभाऊ गिते यांनी व्यक्त केली. ही रोपे आम्ही नक्की जोपासू, अशी भावना वर्‍हाडी मंडळींनी व्यक्त केली. सिन्नर आणि संगमनेर तालुक्यांत याप्रकारच्या उपक्रमाद्वारे विवाहातील कालबाह्य झालेल्या खर्चिक प्रथा थांबवण्यास सहाय्य मिळेल, अशी प्रतिक्रिया शास्त्रज्ञ डॉ. गिते यांनी दिली.

हेही वाचा:

The post नाशिक : वर्‍हाडींना भेट दिली 1 हजार 111 केशर आंबा रोपे appeared first on पुढारी.

Exit mobile version