नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध

नाशिक मनपा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य शासनाच्या निर्देशांनंतर शहरातील तब्बल ८१ जातिवाचक रस्ते, गल्ली, कॉलनी तसेच नगरांची नावे बदलण्याचा ठराव मंजूर करत महापालिकेने शासनाकडे अहवाल सादर केला असला, तरी नवीन नामकरणाला स्थानिकांनी विरोध करत जुनेच नाव कायम ठेवण्याचा हट्टाग्रह केल्याने महापालिकेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शासनाचे आदेश पाळावेत की, स्थानिकांची मागणी पूर्ण करावी, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात सामाजिक सलोखा आणि सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वाढण्याच्या दृष्टीने राज्यातील गावे, वस्त्या व रस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने डिसेंबर २०२० रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला. यासाठी मे २०२१ मध्ये कायदाही पारीत करण्यात आला. त्यासंदर्भातील परिपत्रक महापालिकेच्या समाजकल्याण विभागाला प्राप्त झाल्यानंतर शहरातील रस्ते व वस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेतला गेला. शहरातील विशेषत: गावठाण भागातील वस्त्यांना तसेच रस्त्यांना जातिवाचक नावे आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात एकूण ८१ रस्ते, गल्ली, कॉलनी व नगरांना जातिवाचक नावे असल्याचे समोर आले. विभागीय स्तरावर महापालिकेने स्थापन केलेल्या समितीमार्फत नवीन नावे घेण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत मंजुरी देण्यात आल्यानंतर शासनाला अहवाल सादर करण्यात आला. मात्र काही ठिकाणच्या स्थानिक नागरिकांनी जातिवाचक नावे बदलण्यास विरोध दर्शविला आहे. रविवार कारंजावरील तांबट लेन व तेली गल्ली हे नाव बदलू नये, या आशयाचे पत्र महापालिकेला प्राप्त झाल्याने सरकारचा आदेश पाळायचा की, स्थानिकांची मागणी पुर्ण करायची, अशी अडचण झाली आहे.

अशी आहेत गल्ल्यांची जातिवाचक नावे (कंसात बदललेले नाव)

नाशिक पूर्व विभाग – जुनी तांबट गल्ली (ओमकार लेन), कुंभारवाडा (भूमिनगर), माळी गल्ली (निसर्ग गल्ली), तेली गल्ली (रामशेज गल्ली), मातंग वाडा (स्वाभिमाननगर), राजवाडा (प्रगतिनगर), कोकणीपुरा (जनतानगर), कोळीवाडा (कौशल्यनगर), माळी गल्ली (निर्मल गल्ली), बुरूड गल्ली (यशवंत गल्ली), जोगवाडा (शरयूनगर), मुलतानपुरा (शहीदनगर), साळी गल्ली (शांतिनगर), काजीपुरा (इन्कलाबनगर), वैदूवाडी (अहिंसानगर), आदिवासी वाडा (क्रांतिनगर), माळी गल्ली (उपासनानगर), रामोशी वाडा (सहकारनगर).

———

पश्चिम विभाग – नवीन तांबट लेन (संस्कृती लेन), लोणार लेन (विवेक लेन), मातंग वाडा (मुक्ती वाडा), ख्रिश्चन वाडी (जयपूरनगरी), कुंभार वाडा (धरतीनगर), साळीवाडा (स्नेहनगर ), जुने तांबट लेन (चैतन्य लेन), काजीगढी (गोदागढी).

——

पंचवटी विभाग – वैदुवाडी (पैनगंगानगर), मांग वाडा (नर्मदानगर), धनगर गल्ली (जय हिंदनगर), जोशी वाडा (रायगडनगर), तांबोळीनगर (वेदश्रीनगर), भराडवाडी (रायरेश्वरनगर), वडारवाडी (रामशेजनगर), मोठा राजवाडा (सिंधूनगर), नाथ गल्ली (आनंदीनगरी), पाथरवट लेन (कमल नयन लेन), कोमटी गल्ली (देवगिरीनगरी), भोईवाडा (जनस्थाननगर), कुंभार गल्ली (कलाकृतीनगर), चांभार गल्ली (त्रिकटकनगर), कोळीवाडा (हुतात्मानगर).

————–

नाशिकरोड विभाग – बौद्ध वाडा (समतानगर), गोसावीनगर (आराधनानगर), गवळी वाडा (राधानगरी), बौद्धनगर (नालंदानगर), लिंगायत कॉलनी (तक्षशिला कॉलनी), गोसावीवाडी (जुईनगर), धोबी गल्ली (कल्पवृक्षनगर), महावीरनगर (रायगडनगर), जैन कॉलनी (सम्यकनगर), बौद्ध वाडा (गोकुळधाम), मांग वाडा (गोवर्धननगर), धनगर गल्ली (टायगर गल्ली), तेली गल्ली (प्रगतिनगर), भोई गल्ली (विकासनगर), वाल्मीकनगर (निर्माणनगर), कुंभार गल्ली (कुशलनगर), चांभारवाडा (क्रांतिनगर), लोहार गल्ली (कामगारनगर).

———–

सिडको विभाग – हाजी नगर (खुशबूनगर), झेनतनगर (महेक नगर), हरदास कॉलनी (गुंजन कॉलनी), भिलवाडा (सहजीवननगर), कोळीवाडा (श्रमिकनगर), कोळीवाडा (कर्मयोगीनगर), विश्वकर्मा (आविष्कारनगर).

————–

सातपूर विभाग – कोळीवाडा (गोदावरीनगर), जोशी वाडा (रायगडनगर), कोळी वाडा (सागर वाडा), कोळीवाडा (अंजनेरीनगर), माळी कॉलनी (मयूर कॉलनी), कोळीवाडा (नंदिनीनगर).

हेही वाचा :

The post नाशिक : वस्त्यांची जातिवाचक नावे बदलण्यास स्थानिकांचा विरोध appeared first on पुढारी.