त्र्यंबकेश्वर ( जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
पहिने बारीत असलेल्या नेकलेस धबधबा परिसरात रविवारी (दि.31) दुपारी चारच्या सुमारास मद्यधुंद टोळक्याने दगडफेक करीत तरुणींची छेड काढल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या टोळक्याची धुडगूस वाढत चाललेली पाहून पर्यटकांसह स्थानिकांनी वाडीवऱ्हे पोलिसांना पाचारण केले. आलेल्या पोलिसांनी या मद्यधुंद तरुणांची झिंग उतरवली.
दुपारी उशिरा आलेल्या सात ते आठ युवकांच्या टोळक्याला येथील वन व्यवस्थापन सदस्य आणि महिला वनरक्षक यांनी धबधब्याकडे जाण्यास मज्जाव केला. तथापि मद्यधुंद युवकांनी त्याकडे दुर्लक्ष करीत वनखात्याच्या चौकीपासून दूर असलेल्या ठिकाणावरून आडमार्गाने प्रवेश मिळवला. त्यानंतर ते धबधबा कोसळतो तेथे पोहोचले. तेथे त्यांचा वाद झाला. त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले व त्यांनी दगडफेकीस सुरुवात केली. हा प्रकार बघून तेथे असलेले पर्यटक भेदरले. सोबत लहान मुले, महिला असल्याने त्यांनी तातडीने परतण्यास सुरुवात केली. तेथे असलेले वन व्यवस्थापन समिती स्वयंसेवक अडवण्यास गेले तेव्हा त्यांनाही धुडकावून लावले. यामध्ये काहींना इजा झाली. मद्यधुंद टोळक्याने दगडफेक सुरू केल्यानंतर येथील वन व्यवस्थापन समितीचे स्वयंसेवक धावले. त्यांनी नाशिकहून आलेल्या या युवकांना पाण्यातच फटके मारत ठिकाणावर आणले. दरम्यान, महिला वनरक्षकांनी वेळीच धाव घेऊन या टोळक्यातील गुंडांना आवर घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, वाडीवऱ्हे पोलिस पोहोचले व त्यांनी या टोळक्याला तिथून पिटाळले.
वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे शनिवार-रविवार येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात वन व्यवस्थापन समितीची पावती देऊन धबधब्याची मौज लुटण्यासाठी गेलेल्या पर्यटकांची संख्या 6 हजार 654 इतकी नोंदवली गेली. याव्यतिरिक्त संपूर्ण पहिणे परिसरात किमान 40 हजार पर्यटक आले असावेत, असा अंदाज ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. वाहनांची संख्या पाच हजारांपेक्षा जास्त होती. असे वारंवार होत असल्याने वाहनकोंडीही निदर्शनास आली आहे. निसर्ग सहलीसाठी आलेले पर्यटक कमी आणि मद्यपान करण्यासाठी आलेले जास्त, अशी परिस्थिती अलीकडच्या कालावधीत दिसून आली आहे. त्यामुळे परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
हेही वाचा :
- सातारा : गतवर्षीपेक्षा पाऊस, पाणीसाठा अन् आवकही जास्त
- Girlfriends Day : गर्लफ्रेंड सतत तक्रार का करत असतात? जाणून घ्या मानसशास्त्र काय म्हणते
- कोल्हापूर : महिलेचा गळा आवळून दागिने लुटणार्यास अटक
The post नाशिक : वाडीवऱ्हे पोलिसांनी उतरवली मद्यधुंद पर्यटकांची मस्ती appeared first on पुढारी.