नाशिक : वाढदिवस पार्टीहून परतताना कार अपघातात तरुणी ठार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वाढदिवसाची पार्टी करून परत येत असताना भरधाव कारवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात कारमधील 18 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना गंगापूर शिवारातील गंमतजंमत हॉटेलनजीक घडली. कोमल ओमप्रकाश सिंग (18, रा. पाइपलाइन रोड, गणेशनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या भीषण अपघातात सहा मित्रमैत्रिणी गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सात मित्रमैत्रिणी वाढदिवस साजरा करण्यासाठी गंगापूर भागात गेले होते. तेथून परतत असताना बुधवारी (दि. 3) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास गंगापूर शिवारात त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. कारवरील (एमएच 15 ईएक्स 0949) नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या भिंतीवर जाऊन कार आदळली. या अपघातात कारमधील तरुण, तरुणी बाहेर फेकले गेले. यात कोमलसह हेमंत कमलाकर गायकर (20), वैष्णवी मंडळकर (30), तन्वीर निसार मन्सुरी (22, रा. पखाल रोड), विकास हातांगळे (20), नेहा आसरलाल सोनवी (18) व अतिष किशोर छिडे (20) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता कोमलचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

The post नाशिक : वाढदिवस पार्टीहून परतताना कार अपघातात तरुणी ठार appeared first on पुढारी.