नाशिक : वाळूसाठी खणलेल्या खड्ड्यात भावंडांचा अंत

बुडून मृत्यू,www.pudhari.news

येवला(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील उंदीरवाडी येथे सोमवारी नदीच्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला असून, आपल्या लेकरांना वाचवणाऱ्या आईला बुडण्यापासून ग्रामस्थांनी वाचवले. नदीपात्रात केवळ अवैध वाळू उपशामुळे तयार झालेल्या खड्ड्याने ही दुर्घटना घडली.

येवला तालुक्यात यावर्षी पर्जन्यमानाची परिस्थिती गंभीर आहे. पुरेशी टक्केवारीसुद्धा पाऊस झालेला नसताना आणि तालुक्यातील कोणतेही ओढे, नाले, नद्या या प्रवाही नसताना तसेच कोणतेही बंधारे पूर्णत: भरलेले नसताना केवळ वाळूसाठी खणलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले आहे. असे खड्डे तालुक्यातील विविध नदीपात्रांमध्ये जागोजागी दिसून येतात. उंदीरवाडी येथील भाऊसाहेब जाधव यांच्या पत्नी अनिता जाधव या आपल्या दोन मुलांसह कपडे धुण्यासाठी नारंगी नदीतीरी गेल्या होत्या. कपडे धूत असताना त्यांचा लहान मुलगा गौरव जाधव याचा पाय घसरून तो नदीच्या पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ स्वप्निलने पाण्यात उडी घेतली. मात्र, दोघांनाही पोहता येत नसल्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. हे पाहून आईनेदेखील पाण्यामध्ये उडी घेतली. मात्र, पोहता येत नसल्याने त्याही पाण्यात बुडू लागल्या. हे दृश्य शेजारील काही शेतकऱ्यांनी पाहिले असता त्यांनी दोर फेकून आईला वर काढले. मात्र, दोघा मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा :

 

The post नाशिक : वाळूसाठी खणलेल्या खड्ड्यात भावंडांचा अंत appeared first on पुढारी.