नाशिक : विघ्नहर्त्या बाप्पावरच दरवाढीचे विघ्न

गणेशमूर्ती,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपल्याने, मूर्तिकारांची लगबग वाढली आहे. सार्वजनिक गणेश मुर्त्यांसह घरगुती गणेश मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याचे काम सुरू असून, पुढील काही दिवसातच लाडक्या बाप्पाच्या सुबक मूर्ती बाजारात दाखल होणार आहेत. दरम्यान, कच्चा माल महागल्याने यंदाही मुर्त्यांमध्ये २५ ते ३० टक्क्यांची दरवाढ केली जाणार असल्याचे विक्रेत्यांनी स्पष्ट केले आहे.

‘पीओपी की शाडू माती’ हा गोंधळ कायम असला तरी, सध्या दोन्ही प्रकारच्या मूर्ती बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. नाशिक शहरातील गणेशोत्सवाबरोबरच मूर्तिकारांचे नावदेखील सर्वदूर आहे. नाशिकच्या मूर्तिकारांनी बनविलेल्या मुर्ती या अत्यंत सुबक आणि आकर्षक असल्याने, इतर जिल्ह्यात देखील नाशिकच्या मूर्तींना मागणी आहे. दरम्यान, यंदा मूर्तीसाठी लागणारा कच्चा माल, कामगारांची मंजूरी, रंगांच्या वाढलेल्या किंमती, वाहतूक खर्च यासर्व बाबींचा परिणाम मूर्तींच्या किंमतीत होणार आहे. विक्रेत्यांच्या मते, सर्वच बाबतीत खर्च वाढल्याने यंदाच्या मूर्तींमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ अपरिहार्य बनली आहे. दरम्यान, बाप्पाच्या मूर्तींच्या किंमतीत वाढ होणार असली तरी, भाविकांमधील उत्साहावर याचा फारसा परिणाम होणार आहे. यंदा अधिक महिना असल्याने गणेशोत्सव महिनाभर लांबला आहे. मात्र, गणराच्या स्वागताची तयारी सुरू झाली असून, लवकरच गणेशोत्सवाचा आनंद सर्वदूर बघावयास मिळणार आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यावर सर्वांचा भर आहे. त्यासाठी शाडू मातीच्या गणेश मुर्ती बनविण्याचे आवाहन यापूर्वीच प्रशासनाने केले आहे. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा काही विक्रेत्यांनी आग्रह केल्याने बाजारात प्लास्टिक आॅफ पॅरिसच्या मूर्ती विक्रीसाठी आणल्या जाण्याची शक्यता आहे.

शाडूच्या मुर्तींची किंमत अधिक
शाडूच्या मूर्ती वजनाने तीनपट जड आणि किंमतीला न परवडणाऱ्या असतात. यंदाही या मुर्तींच्या किंमती अधिकच आकारल्या जाणार आहेत. कारण या मूर्तींसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने मुर्तींच्या किंमतीत देखील २५ ते ३० टक्क्यांची वाढ निश्चित मानली जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : विघ्नहर्त्या बाप्पावरच दरवाढीचे विघ्न appeared first on पुढारी.