नाशिक : विजेच्या धक्क्याने पोलिसपाटलाचा मृत्यू

shinde www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील हरसुले येथे विहिरीवर वीज पंप सुरू करण्यास गेलेल्या पांडुरंग लहानू शिंदे (43) या पोलिसपाटलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. 13) रात्री 11.30 च्या सुमारास घडली. रविवारी (दि. 14) सकाळी त्यांचा मृतदेह विहिरीत पडलेल्या स्थितीत आढळला. पांडुरंग शिंदे यांनी सिन्नर-घोटी महामार्गाजवळील शेततळ्यात फ्लॉवर पीक घेतले आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी शेतीला वीजपंप सुरू करण्याची वेळ दिली आहे. त्यामुळे रात्री 11.30 ला वीज आल्याने ते पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. मात्र, वीज पंप सुरू करताना त्यांना विजेचा धक्का लागून ते विहिरीत पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळपर्यंत ते घरी न आल्याने शिंदे परिवाराने सकाळी शिवारात त्यांचा शोध घेतला. मात्र, त्यांचा तपास लागत नव्हता. त्यानंतर पोहणार्‍या व्यक्ती आणून आसपासच्या शेतकरी बांधवांनी विहिरीत शोध घेतला. त्यानंतर पाण्यातून शिंदे यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला. पंप सुरू करताना विजेचा धक्का बसल्याने त्यांचा विहिरीत पाय घसरून तोल गेला. त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते. त्यानंतर मृतदेहावर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.

हेही वाचा:

The post नाशिक : विजेच्या धक्क्याने पोलिसपाटलाचा मृत्यू appeared first on पुढारी.