नाशिक : विडी कामगारनगरला चार लाखांचा गुटखा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात गुटखा विक्री, साठा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कारवाई करीत साडेचार लाख रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे.

गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकातील अंमलदार मुख्तार शेख यांना मंगळवारी (दि.१५) विडी कामगारनगर येथील हनुमान मंदिराच्या पाठीमागील खोलीत गुटख्याचा साठा व विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून कारवाई केली. पत्र्यांच्या वाळीतील खोल्यांची पाहणी केली असता उमेश बाळू लुंगे (३०, रा. स्वामी विवेकानंदनगर, विडी कामगार नगर वसाहत) हा संशयास्पद उभा असल्याचे आढळले. त्याच्याकडील खाेलींची झडती घेतली असता त्यात विक्रीसाठी ठेवलेला ४ लाख ३ हजार ६०० रुपयांचा गुटखा आढळून आला. पोलिसांनी हा साठा जप्त केला आहे. याबाबत हवालदार रामदास भडांगे यांनी फिर्याद दिली असून, लुंगेविरुद्ध आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले, सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे, रवींद्र बागूल, हवालदार रामदास भडांगे, नाजीम पठाण, प्रवीण वाघमारे, योगीराज गायकवाड, संदीप भांड, प्रदीप म्हसदे, शरद सोनवणे, अंमलदार विशाल देवरे, विशाल काठे, चालक सहायक उपनिरीक्षक किरण शिरसाठ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा :

The post नाशिक : विडी कामगारनगरला चार लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.