नाशिक : विद्यार्थिनी गिरवणार सॅटेलाइट निर्मितीचे धडे

सॅटेलाइट www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
विद्यार्थ्यांनी बनविलेले 150 पिको सॅटेलाइट आणि परत वापरता येणारे रॉकेटसह प्रक्षेपण असा जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग येत्या 19 फेब्रुवारीला तामिळनाडूतील पत्तीपुरम येथे केला जाणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये होणार आहे. या प्रकल्पासाठी येथील जिजामाता कन्या विद्यालयातील 10 गुणवंत विद्यार्थिनींची निवड झाली आहे. त्यांना पिको उपग्रह आणि रॉकेट बनविण्यासंबंधित 10 दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हाउस ऑफ कलाम, स्पेस झोन इंडिया, मार्टिन ग्रुप यांच्या वतीने भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल मिशन-2023 आयोजित करण्यात आले आहे. 19 फेब्रुवारीला पत्तीपूरम येथून 150 पिको सॅटेलाइट हे परत वापरले जाणारे रॉकेटसह प्रक्षेपित होणार आहेत. तेे उपग्रह प्रक्षेपित केल्यानंतर पॅराशूटच्या मदतीने परत जमिनीवर उतरणार आहेत. असा प्रयोग सर्वप्रथम अमेरिकेमध्ये एलॉन मस्क यांनी केला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बनविलेले 150 पिको सॅटेलाइट आणि परत वापरता येणारे रॉकेटसह प्रक्षेपण असा जगातील पहिलाच शैक्षणिक प्रयोग केला जात आहे. या प्रकल्पातील सहभागी विद्यार्थ्यास वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, असिस्ट वर्ल्ड रेकॉर्ड यांकडून प्रशस्तिपत्र दिले जातील. या प्रकल्पात जिजामाता कन्या विद्यालयाच्या प्राची निकमच्या नेतृत्वात अक्षरा आबा आढाव, नजमा लियाकत शेख, प्रेरणा गोरख सोनवणे, वैष्णवी बबन भामरे, गायत्री संतोष थोरात, रोशनी मनोहर आहेर, मुग्धा आहेर, अनुष्का सावंत, प्रणाली पवार सहभागी होत आहेत. महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषा चौधरी तसेच जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी, डॉ. भाग्यश्री वानखेडे, पर्यवेक्षक डॉ. सुनील आहेर यांच्या प्रयत्नाने विद्यालयाच्या विद्यार्थिनींना ही संधी मिळाली आहे.

डॉ. कलाम फाउंडेशनचा प्रकल्प…
निवडपात्र विद्यार्थ्यांची लवकरच पुणे, नागपूर आणि परभणी येथे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. त्यात उपग्रह बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाईल. तसेच त्यातील गुणवंत प्रथम 100 विद्यार्थ्यांना चेन्नई येथे जाऊन प्रत्यक्ष रॉकेट बनविता येईल. हा प्रकल्प मिसाईलमॅन, माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम् (तामिळनाडू) या संस्थेमार्फत भारतभर राबवला जात आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : विद्यार्थिनी गिरवणार सॅटेलाइट निर्मितीचे धडे appeared first on पुढारी.