Site icon

नाशिक : विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी, तिघांना अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

संदीप युनिर्व्हसिटीच्या आवारात विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली असून, त्यात एका युवकास गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेने संदीप युनिर्व्हसिटीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

१८ वर्षीय विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या आठवड्यात दुपारच्या सुमारास विद्यार्थ्यांचा एक गट युनिर्व्हसिटीतील कॅन्टीनजवळ बसलेला असताना दुसऱ्या गटातील संशयिताने एका विद्यार्थ्यास मारहाण केली. यात एकाने मध्यस्थी केली असता संशयितासह इतरांनी मिळून त्या विद्यार्थ्यास मारहाण केली. युनिर्व्हसिटीच्या आवारातील हा वाद इतर विद्यार्थ्यांनी मिटवला व तेथील सुरक्षारक्षकांनी दोघा विद्यार्थ्यांना युनिर्व्हसिटीच्या प्रवेशद्वारावर नेले. त्यावेळी एका गटातील विद्यार्थ्याने त्याच्या भावास बोलावल्याने तो पालकांसह तेथे आला. दुसऱ्या गटातील संशयितांनी त्याच्या भावास शिवीगाळ करीत बेदम मारहाण करीत डोक्यास गंभीर दुखापत केली. या प्रकरणी विद्यार्थ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. त्यात तिघा संशयितांना अटक केली आहे. तर दुसऱ्या गटातील एकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, कुरापत काढून चौघांनी मिळून मारहाण केली. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल आहे. युनिर्व्हसिटीच्या आवारात व प्रवेशद्वाराजवळच ही घटना घडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेमुळे युनिर्व्हसिटी प्रशासनाचे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपास पुष्टी मिळत आहे.

परिसरात सुरक्षारक्षक(बाउन्सर) असले तरी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त नसल्याचे बोलले जात असून, विद्यार्थ्यांसोबतच बाहेरील टवाळखोरांचा वावर वाढल्याने विद्यार्थिनींसह अभ्यासू विद्यार्थ्यांमध्ये दहशत पसरत आहे. या घटनांमुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. युनिर्व्हसिटी परिसरासह तेथील आसपासच्या परिसरात टवाळखोर व विद्यार्थ्यांचा वावर वाढला आहे. भरधाव वाहने चालवणे, घोळक्याने उभे राहून शिवराळ भाषेत बोलणे, हाणामारी यांसारख्या प्रकारांनी गावकरीही त्रस्त आहेत. या घटनांवर अंकुश बसत नसल्याने त्यांचा रोष वाढल्याचे दिसते.

मारहाण प्रकरणी तिघा संशयितांना अटक केली आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला मारहाणीचा व्हिडिओ खूप जुना असून, त्याचा या घटनेशी संबंध नाही.

– संदीप रणदिवे, पोलिस निरीक्षक, त्र्यंबकेश्वर पोलिस ठाणे

हेही वाचा :

The post नाशिक : विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी, तिघांना अटक appeared first on पुढारी.

Exit mobile version