नाशिक : विद्या विकास बनलय वाहतूक कोंडीचे सर्कल, वाहनधारकांच्या तासन‌्तास रांगा

विद्या विकास सर्कल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील अत्यंत महागडा आणि ‘पाॅश एरिया’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलवरील वाहतूक कोंडीने चालकांसह स्थानिक रहिवासी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या सर्कलवर वाहनांच्या तासन‌्तास रांगा लागत असून, येथून वाहन बाहेर काढण्यासाठी वाहनधारकांना बराच वेळ ताटकळत रहावे लागत आहे. यामुळे नागरिकांचा वेळही वाया जात असून, मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहन सुरू ठेवावे लागत असल्याने पेट्रोलही खर्ची होत असल्याने आर्थिक भुर्दंडही बसत आहे. सर्कललगतच्या व्यावसायिकांना कर्णकर्कश हॉर्नमुळे ध्वनिप्रदूषण आणि वायू प्रदूषणाचाही सामना करावा लागत आहे.

गंगापूर रोड परिसरात शाळा-महाविद्यालये, महत्त्वाची हॉस्पिटल्स, प्राचीन मंदिरे आणि अालिशान बंगले-इमारती असल्याने येथून दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. या रोडवर जुना गंगापूर नाका, विद्या विकास सर्कल, केबीटी सर्कल, प्रसाद सर्कल, स्वामी समर्थ सर्कल, जेहान सर्कल, भोसला महाविद्यालय चौक, आनंदवली चौक असे महत्त्वाचे चौक आहेत. या चौकांमध्ये दिवसभर वाहतूक कोंडी असते. त्यामुळे यापैकी जुना गंगापूर नाका, जेहान सर्कल आणि आनंदवली जवळील चौक अशा तीन ठिकाणी केवळ सिग्नल्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी कमी झाली असली तरी उर्वरित चौकांमध्ये आजही वाहतूक कोंडी पाहायला मिळते. या रोडवरील विद्या विकास सर्कलवर मात्र दररोजच वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे येथे नेहमीच लहान-मोठे अपघात होत असतात. वाहनाधारकांच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाचाही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत मनपा प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटत नसल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. वाहनांच्या विळख्यात असणाऱ्या या सर्कलवरून मार्गक्रमण करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या चौकातील वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

सिग्नलला लागेना मुहूर्त

नागरिकांच्या मागणीवरून गंगापूर रोडवरील विद्या विकास सर्कलसह अन्य दोन चौकांमध्ये सिग्नल्स बसविण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रस्ताव दिलेले आहेत. मात्र, बऱ्याच दिवसांपासून हे प्रस्ताव मार्गी लागलेले नाहीत. त्यामुळे सिग्नल यंत्रणा बसविण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. सद्यस्थितीत विद्या विकास सर्कलवर सिग्नल यंत्रणा बसविणे अत्यंत गरजेचे आहे.

लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांचा दररोजचा मार्ग

गंगापूर रोड परिसरात विद्यमान आमदार, खासदार, मंत्री, नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. शिवाय महापालिकेसह विविध शासकीय अधिकाऱ्यांचेही अालिशान बंगले याच परिसरात आहेत. त्यामुळे या लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनादेखील अनेकदा या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते. मात्र, अद्यापही या वाहतूक कोंडीवर तोडगा निघत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : विद्या विकास बनलय वाहतूक कोंडीचे सर्कल, वाहनधारकांच्या तासन‌्तास रांगा appeared first on पुढारी.