नाशिक : विद्या विकास सर्कल येथे इलेक्ट्रीक बाईकने अचानक घेतला पेट

इलेक्ट्रीक बाईक जळून खाक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गंगापुररोडवरील विद्याविकास सर्कल जवळ गुरूवारी (दि.२९) दुपारी एकच्या सुमारास फुटपाथजवळ उभ्या असलेल्या ई बाईकला अचानक आग लागली. आगीची घटना लक्षात येताच स्थानिक व्यावसायिकांनी दुकानांमधील फायर एक्स्टिंग्युशरच्या मदतीने आग विझवली. या आगीत दुचाकीचे नुकसान झाले आहे.

गंगापूर रोडवरील प्रसाद मंगल कार्यालयाजवळ राहणारे रवींद्र आव्हाड हे कामानिमित्त विद्या विकास सर्कल येथे गेले होते. त्यांनी त्यांच्याकडील ई बाईक रस्त्याच्या कडेला पार्क करून दुकानात गेले. त्यावेळी दुचाकीतून अचानक धुर येत असल्याचे लक्षात आले. त्यामुळे आव्हाड यांनी आरडा ओरड करीत मदत मागितली. तेथील व्यावसायिकांनी फायर एक्स्टिंग्युशरद्वारे दुचाकीची आग विझवण्यास सुरुवात केली. काही क्षणात आगीवर ताबा मिळवता आला.

दरम्यान, आगीची माहिती अग्निशमन दलासही मिळाल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आग विझवण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलातील सुत्रांनी सांगितले. ई बाईकने अचानक पेटल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच पेटलेली दुचाकी पार्किंगमधून रस्त्यावर आणल्याने तेथे काही वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी जळालेली दुचाकी बाजूला करत वाहतुक सुरळीत करून दिली. याप्रकरणी गंगापुर पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : विद्या विकास सर्कल येथे इलेक्ट्रीक बाईकने अचानक घेतला पेट appeared first on पुढारी.