Site icon

नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकच्या विनयनगर भागात बांधकाम व्यावसायिक व अधिकार्‍यांनी संगनमत करून दलित सैनिकाची जमीन बेकायदेशीर विकण्याचा घाट घातला असून, कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. नाशिक महापालिका व आयुक्तांकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे.

विनयनगर भागात दलित कुटुंबाला सैन्यात काम केले म्हणून मिळालेली जमीन जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय विकण्याचा प्रकार होत आहे. या प्रक्रियेत शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झालेले असताना महसूल विभाग बोटचेपी भूमिका घेत आहे. आता या भागात विनापरवाना बांधकाम होत असतानादेखील महापालिकेचे अधिकारी कारवाई करण्यास तयार नाही. स्थानिक नागरिक लोकप्रतिनिधींनी वारंवार तक्रारी करूनदेखील महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यास तयार नसल्याचे आमदार फरांदे यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर झोपडपट्टी तयार करण्याचा घाट नाशिक महापालिकेच्या काही अधिकार्‍यांनी घेतल्याचा आरोप आमदार फरांदे यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकारात झालेल्या गैरव्यवहाराबाबतची कागदपत्रे आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. याबाबत शासनाकडून तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार फरांदे यांना दिले.

हेही वाचा:

The post नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Exit mobile version