नाशिक : नाशिक विभागात कोरोना उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होत आहे. विभागात आतापर्यंत दोन लाख ७४ हजार ६३२ रुग्णांपैकी ९७.३० टक्के म्हणजे, दोन लाख ६७ हजार २३० रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्यःस्थितीत दोन हजार २३७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत विभागात १.८८ टक्के म्हणजे, पाच हजार १६५ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ यांनी ही माहिती बुधवारी (ता. १७) येथे दिली.
डॉ. गांडाळ म्हणाले, की विभागातील १२ लाख ७१ हजार ६५३ जणांची प्रयोगशाळेत चाचणी करण्यात आली आहे. सध्या उपचार घेणाऱ्यांपैकी पाच हजार ५५ व्यक्ती घरांमध्ये उपचार घेताहेत, तर १७८ जणांना आरोग्य संस्थांमध्ये विलगीकरण करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२३ टक्के आहे. आतापर्यंत एक लाख १८ हजार ५१३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, एक लाख १५ हजार २४२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक हजार १९७ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील दोन हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय
जळगावमध्ये ९७ टक्के रुग्ण बरे
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार ७८० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ५५ हजार ८९० रुग्ण बरे झाले आहेत. तसेच ५२२ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.७२ टक्के इतके आहे. आतापर्यंत एक हजार ३६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच धुळे जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५२ टक्के आहे. धुळ्यातील आतापर्यंत १४ हजार ९८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १४ हजार ४६४ रुग्ण बरे झाले आहेत. १३० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.२४ टक्के आहे. नंदुरबारमध्ये आतापर्यंत दहा हजार १७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, नऊ हजार ६४१ रुग्ण बरे झाले आहेत. १६१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २१५ जणांचा मृत्यू झाला आहे, असेही डॉ. गांडाळ यांनी सांगितले.
हेही वाचा - नियतीने पुन्हा तिचे बाळ 'तिच्या' झोळीत टाकले! मातेचे कोरडे पडलेले डोळे पुन्हा पाणावले
नगर जिल्ह्याची स्थिती
० रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१६ टक्के.
० आतापर्यंत ७३ हजार ३३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ७१ हजार ९९३ रुग्ण बरे झाले.
० २२७ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
० आतापर्यंत एक हजार ११७ रुग्णांचा मृत्यू झाला.