नाशिक विभागात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– ऐन फेब्रुवारी महिन्यातच नाशिक विभागामध्ये उन्हाचा पारा चढला आहे. वाढत्या ऊन्हाच्या कडाक्यासोबत विभागामध्ये टंचाईच्या झळाही दाटल्या आहेत. विभागातील धरणांमध्ये केवळ ५० टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गावोगावी पाण्याचे स्त्राेत आटल्याने टँकरच्या फेऱ्यांतही वाढ झाली आहे. चालू महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच टँकरची संख्या २०१ वर पोहोचली असून, ६९४ गावे-वाड्यांना टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात आहे.

गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने उत्तर महाराष्ट्रातील पाण्याचे संकट अधिक गडद झाले आहे. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यातच विभागातील धरणांच्या पाणीपातळीत लक्षणीय घसरण झाली आहे. विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर या पाच जिल्ह्यांमधील ५३७ छोटे, मध्यम व मोठ्या प्रकल्पांमध्ये २ हजार ९९३ मिलियन क्युबिक मीटर्स (एमसीयूएम) म्हणजे ५० टक्के साठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हे प्रमाण ६४ टक्के इतके होते. एकीकडे धरणांंच्या पाणीपातळीत घसरण होत असताना गावा-गावांमधील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोतही कोरडेठाक पडू लागले आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील जनतेला पाण्यासाठी शासकीय टँकरवरच अवलंबून राहावे लागते.

विभागात नंदुरबार वगळता उर्वरित चारही जिल्ह्यांमध्ये टँकर सुरू झाले आहेत. सध्या एकूण २२५ गावे आणि ४६९ वाड्या अशा एकूण ६९४ ठिकाणी २०१ टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. या माध्यमातून विभागातील २ लाख ४४ हजार ३९ ग्रामस्थांची तहान भागविण्यात येत आहे. विभागात सर्वाधिक १७० टॅंकर एकट्या नाशिकमध्ये धावताहेत. जिल्ह्यातील सात तालुक्यांत १ लाख ३१ हजार ५२९ ग्रामस्थांना टँकरच्या माध्यमातून पाणी पुरविले जात आहे. त्याखालोखाल जळगावमध्ये १७, नगरला १३ व धुळ्यामध्ये एक टँकर सुरू आहे. येत्या काळात उन्हाच्या वाढत्या चटक्यासोबत पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर निर्माण होणार आहे. परिणामी, पाण्याकरिता ग्रामीण जनतेच्या नशिबी टँकरची प्रतीक्षाच असणार आहे.

विभागातील धरणांचा साठा

प्रकार      धरणे       २०२४ (टक्के)     २०२३ (टक्के)

मोठे         22              53                    65

मध्यम     54             54                    69

छोटे       461             37                    57

एकूण     537            50                      64

 

विभागातील टँकर

जिल्हा      गावे/वाड्या    संख्या     लोकसंख्या

नाशिक           599         170        131529

जळगाव          16           17            40198

नगर              99           13            31857

धुळे               20           01            40455

एकूण            694        201          244039

टंचाईच्या झळा

-विभागात पाण्याकरिता ५० विहिरी अधिग्रहित

-विभागात नांदगाव सर्वाधिक दुष्काळी

-नांदगाव तालुक्यात ४९ टँकरने पाणीपुरवठा

-नंदुरबारमध्ये सुदैवाने एकही टँकर नाही

-मार्चच्या प्रारंभी टँकर २५० वर पोहोचण्याची शक्यता

जिल्हाधिकारी आज घेणार बैठक

जिल्ह्यातील वाढती पाणीटंचाई लक्षात घेता जिल्हाधिकारी जलज शर्मा हे आज आढावा बैठक घेणार आहे. या बैठकीत प्रांत, तहसीलदार यांना सूचना करणार असल्याचे समजते.

हेही वाचा :

The post नाशिक विभागात टंचाईच्या झळा, धरणांमध्ये निम्माच पाणीसाठा appeared first on पुढारी.