नाशिक विमानतळावरून आता दररोज उड्डाणे, सुधारित वेळापत्रक असे

विमान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोना काळात विस्कळीत झालेल्या नाशिकच्या विमानसेवेला गती मिळत असून, लवकरच विमानतळावरून दररोज उड्डाणे घेतली जाणार आहेत. सध्या नाशिकमधून आठवड्यातील सहा दिवस विमानसेवा सुरू असून, 22 जुलैपासून आठवड्यातील सर्व दिवस नाशिकच्या विमानतळावरून तीन आघाडीच्या कंपन्यांची विमाने झेप घेणार आहेत. त्याबाबतचे सुधारित वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले असून, सद्यस्थितीत दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगाव, हैदराबाद या शहरांना जोडणारी सेवा सुरू आहे.

कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून विमानसेवा बंद होती. आता कोरोनाचे सावट बर्‍यापैकी कमी झाले असून, पुन्हा एकदा नियमित सेवा सुरू झाली आहे. सद्यस्थितीत एअरलाइन्स एअर आणि स्टार एअर या दोन कंपन्यांची सेवा सुरू आहे. एअरलाइन्स एअरने शनिवार वगळता इतर सर्व दिवशी सेवा सुरू ठेवली आहे. दिल्ली, अहमदाबाद, पुणे, बेळगाव या चार शहरांना जोडणारी सेवा या कंपनीकडून सुरू आहे. त्याचबरोबर स्टार एअरकडून नाशिक-बेळगाव ही सेवा सोमवार आणि शुक्रवार या दोन दिवशी सुरू ठेवली आहे. त्याव्यतिरिक्त नाशिक-पुणे ही सेवा रविवार असणार आहे. तर स्पाइस जेटकडून नाशिक-हैदराबाद ही सेवा 22 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. तर नाशिक-दिल्ली 4 ऑगस्टपासून सुरू केली जाणार आहे. आठवड्यातील सातही दिवस ही सेवा सुरू राहणार आहे.

एकूणच नाशिकच्या विमानसेवेला पुढच्या काही दिवसांत गती मिळणार असून, नियमित सेवेमुळे नाशिकच्या व्यापार-उद्योगाला मोठा लाभ होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आणखी काही कंपन्या नाशिकमध्ये येण्यास उत्सुक असून, पुढच्या काही दिवसांत इतर शहरांमध्येही नाशिकवरून विमानसेवा सुरू होणार आहे. नाशिक-गोवा ही बहुप्रतीक्षित विमानसेवा सुरू व्हावी, अशी अपेक्षाही नाशिककरांकडून व्यक्त केली जात आहे.

असे असेल वेळापत्रक
एलाइन्स एअर या कंपनीकडून दिल्ली-नाशिक ही सेवा सकाळी 5.35 ते 9.35 अशी असेल. तर नाशिकहून दिल्लीसाठी सायंकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी विमान झेप घेणार असून, दिल्लीत रात्री 9 वाजता त्याचे आगमन होईल. अहमदाबाद-नाशिक सकाळी 8.20 ते 9.35 अशी वेळ असेल. नाशिक-अहमदाबाद फ्लाइटची वेळ सायंकाळी 5.05 ते 6.15 अशी असेल. नाशिक-पुणे सकाळी 10.15 ते 11.30 असेल तर पुणे-नाशिक दुपारी 3.25 ते 4.40 असा असेल. नाशिक-बेळगाव सकाळी 10.15 ते दुपारी 1.15 असा असेल. बेळगाव-नाशिकची वेळ 1.45 ते 4.40 अशी असेल. स्टार एअरच्या फ्लाइटच्या वेळादेखील सकाळ आणि सायंकाळ अशा प्रकारच्या असणार आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक विमानतळावरून आता दररोज उड्डाणे, सुधारित वेळापत्रक असे appeared first on पुढारी.