नाशिक विमानसेवा सुसाट! आणखी आठ शहरे हवाई सेवेने जोडणार 

नाशिक : जानेवारी व फेब्रुवारीत ओझर विमानतळावरून अहमदाबाद, पुणे, हैदराबाद, दिल्ली शहरांमध्ये सतरा हजार प्रवाशांनी विमानप्रवास केला. प्रवाशांच्या चांगल्या प्रतिसादामुळे विमान कंपन्यांकडून आणखी आठ शहरे हवाई सेवेने जोडली जाणार आहेत. कोलकता, सुरत, जोधपूर, सिंधुदुर्ग, गोवा व चेन्नई ही महत्त्वाची शहरे हवाई सेवेने जोडली जाणार आहेत. 

एचएएलच्या ओझर विमानतळावर टर्मिनल उभारण्यात आल्यानंतर २०१८ मध्ये विमानसेवेला प्रारंभ झाला. एअर डेक्कन कंपनीच्या मुंबई, पुणे हवाई प्रवासाला अनियमिततेमुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत विमानसेवा सुरू झाली. मात्र, तांत्रिक कारणामुळे सेवेत खंड पडला. त्यानंतर केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत विमानसेवेने चांगलेच उड्डाण घेतले. जानेवारीत १६ हजार, तर फेब्रुवारीत सतरा हजार प्रवाशांनी प्रवास केल्याने विमान कंपन्यांनी सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. अलायन्स एअर कंपनीतर्फे अहमदाबाद, हैदराबाद, पुणे स्पाइस जेट कंपनीतर्फे दिल्ली, पुणे, बेंगळूरू टू जेट कंपनीतर्फे अहमदाबाद तर स्टार एअरवेज कंपनीतर्फे बेळगाव हवाई सेवा सुरू आहे. आता स्पाइस जेटतर्फे कोलकता, सुरत, तसेच अन्य कंपन्यांकडून जोधपूर, जयपूर, सिंधुदुर्ग, बेंगळूरू व चेन्नई अशी हवाई सेवा सुरू होणार आहे.

हेही वाचा - झटपट श्रीमंतीच्या मोहात तरुणाई गुन्हेगारीकडे! द्राक्षनगरीत फोफावतेय भाईगीरीचे वेड

नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी काही दिवसांत महापालिकेतर्फे शहर बससेवा सुरू केली जाणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ९२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ राज्य शासनानेही मेट्रोसाठी दोन हजार १०० कोटी रुपयांची घोषणा केल्याने नाशिकची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. दुसरीकडे हवाई सेवेला मिळणारा चांगला प्रतिसाद व हवाई सेवेचा अधिक विस्तार होत आहे. 

हवाई सेवेच्या विस्तारामुळे नाशिकच्या उद्योग, व्यवसाय, पर्यटनाला चालना मिळणार आहे. वर्षाअखेर देशातील आणखी पंधरा प्रमुख शहरांमध्ये हवाई सेवा सुरू होईल. 
- मनीष रावल, अध्यक्ष, एव्हिएशन कमिटी, नाशिक 

हेही वाचा - एक विलक्षण प्रेम! बाभळीच्या झाडात अडकलेल्या साथीदारासाठी लांडोराची घालमेल; पाहा VIDEO