नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला

लासलगाव(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा : मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 15 ऑक्टोंबर च्या स्थितीत अनुसार 65 टक्क्याच्या  खाली असल्याने नाशिक आणि नगर जिल्ह्यातील धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन असल्याने नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न आज पेटल्याचे चित्र निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या वक्रकार गेट समोर पाहायला मिळाले. भाजप नेत्या अमृता पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन केले. जर जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास त्याच पाण्यामध्ये मोठ्या संख्येने जलसमाधी घेण्याचा थेट इशारा पाटबंधारे विभागासह शासनाला दिल्याने येणाऱ्या दिवसात नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष निर्माण होणार  आहे.

यंदाच्या पावसाच्या हंगामात अल्प पाऊस झाल्याने राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, येवला मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, सटाणा तालुक्यात भीषण पाणी टँचाई निर्माण झाली असतांना टँकर द्वारे पाणी पुरवठा ग्रामीण भागात सुरु असून यातच आता दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडून ऑक्टोबर महिन्यात देण्यात आल्याने नाशिक जिल्हा भाजप महिला मोर्चा अध्यक्षा अमुता पवार यांच्या नेतृत्वाखाली बाबासाहेब गुजर, गोरख गायकवाड, राजाराम मेमाणे,लहानू मेमाणे, केदारनाथ तासकर, शरद शिंदे, मिलन पाटील, अरुण आव्हाड, आंबादास घोटेकर, भागवत वाघ, रवी आहेर, किशोर बोचरे, विलास नांगरे, श्रीहरी बोचरे, अंकुश तासकर, संदीप लोहटकर, दशरथ सांगळे, संजय पगारे, बापु पगारे, रंगनाथ घोटेकर, किरण कुलकर्णी, गोरख कांदळकर आदी आंदोलकांनी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाच वक्रकार गेट समोर नदी पत्रात उतरून एक तास ठिय्या आंदोलन केले यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.

250 क्यूसेक पूर पाण्याचा विसर्ग 

यंदाच्या मान्सून मध्ये राज्यात अल्प पाऊस झाल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट असतांना नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून मान्सून माघारी गेल्यानंतरही पूर पाण्याचा 250 क्यूसेक ने दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील जायकवाडीच्या दिशेने गोदावरी नदी पत्रात विसर्ग सुरु असून या पावसाच्या हंगामात शुक्रवारी सकाळपर्यंत 17 टीएमसी पाण्याचे विसर्ग झाले आहे.

जलसमाधीचा इशारा

नाशिक जिल्ह्यात अल्प पाऊस झालेला असतानाही नांदूर मधमेश्वर धरणातून या पावसाच्या हंगामात 17 टी एम सी पाणी जायकवाडी धरणासाठी सोडलेला असतानाही आता पाण्याची मागणी केली जात असून फक्त मद्य बनवणाऱ्या कंपन्यांसाठी पाण्याची मागणी केली जात असल्याचा आरोप करत एक थेंबही पाणी जायकवाडीला सोडून देणार नाही.  त्याच पाण्यात सर्वात अगोदर मी जलसमाधी घेईल. – बाबासाहेब गुजर, आंदोलक शेतकरी

हेही वाचा :

The post नाशिक विरुद्ध मराठवाडा पाणी प्रश्न पेटला appeared first on पुढारी.