
नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वडाळी, सोयगाव या भागातील बसफेऱ्या अचानक रद्द केल्या असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. बसची वाट पाहण्यात प्रवाशांचे किमान दोन-तीन तास खर्ची पडत आहेत.
दहेगाव, मोरझर, वडाळी, सोयगावातील प्रवासी तसेच विद्यार्थी येवला आणि नांदगाव या दोन शहरांकडे जाण्यासाठी बससेवेवर अवलंबून आहेत. परंतु गेल्या अनेक दिवसांपासून बससेवा सुरळीत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोनापूर्वी या भागातून अनेक ठिकाणी बसेस धावत होत्या. परंतु कोरोना काळात या बसेस बंद करण्यात आल्या. कोरोनानंतर आता सर्व सुरळीत सुरू झाले असले, तरी बससेवा विस्कळीतच असल्याने प्रवासी त्रस्त आहेत. या भागातील विद्यार्थी नांदगावकडे शिक्षणासाठी जातात, परंतु या भागातील बससेवा सुरळीत नसल्याने कधी पायी, तर कधी खासगी वाहनांतून विद्यालयात जाण्याची वेळ येते.
ऐनवेळी बसफेरी रद्द
प्रवाशांसाठी सकाळी येवला शहराकडे जाण्यासाठी सकाळी 9 ला नांदगाव आगारातील एकमेव बस जात असते. परंतु या बसची फेरी अनियमित असून, कधी कधी तास-तास प्रतीक्षा केल्यानंतर बसफेरी रद्द करण्यात आल्याचे समजते.
माझे काही नातेवाईक येवल्याकडे जाण्यासाठी सकाळपासून बसची वाट बघत होते. तासनतास उभे राहूनही बस आली नाही. आगारात फोन करून विचारले असता, बस रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. नांदगाव आगारात असा प्रकार कायमच घडत असतो. -अण्णा सदगीर, ग्रामस्थ.
हेही वाचा:
- Pranav Bhopale: वडणगेतील प्रणवचा फुटबॉल फ्रीस्टाईलमध्ये तिसरा विश्वविक्रम
- मनीष सिसोदिया यांना चार मार्चपर्यंत सीबीआय कोठडी
- Share Market Closing Bell – बाजारात घसरण : अदानी पोर्टसचा दिलासा तर बाजाज ऑटोची मोठी घसरण
The post नाशिक : विस्कळीत बससेवेने वडाळी, सोयगावचे प्रवासी त्रस्त appeared first on पुढारी.