नाशिक : वीजचोरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही ; महावितरणची माहिती

वीज चोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गौळाणे शिवारात चार दिवसांपूर्वी महावितरणने टाकलेल्या धाडीत २४ लाखांची वीजचोरी ऊघड केली असून याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल असलेल्या दोघा संशयित आरोपींचा मनसे पदाधिकाऱ्यांशी संबंध नसून यातील एक संशयित दिलीप ततार असल्याचा दावा महावितरणने केला आहे.

महावितरणच्या पथकानेगौळाणे शिवारातील प्लास्टीक दाणे निर्मिती कारखान्यावर छापा टाकला असता तेथे वीजमीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळून आले. त्याद्वारे २४ लाख ५३ हजार ५६० रूपयांची वीजचोरी उघडकीस आणली असून तब्बल १ लाख ५९ हजार १५ युनिटची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. पथकातील अधिकाऱ्यांनी तेथे उपस्थित अरबाज सलीम शेख यांच्याकडे विचारणा केली असता कारखाना व तेथील यंत्रसामुग्री ही दिलीप दातीर यांची असल्याचे सांगितले. त्यानूसार अधिकाऱ्यांनी सुमारे १३ महिने वीजचोरीचा ठपका ठेवत अरबाज शेख व दिलीप दातीर यांच्याविराेधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. मात्र, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयितांमध्ये दिलीप दातीर यांचे नाव पुढे आल्याने तसेच ते मनसेचे शहराध्यक्ष असल्याने सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे.

वीजचाेरीच्या यासर्व प्रकरणात महावितरणने अधिक खोलात जाऊन पडताळणी केली असता गुन्हा दाखल केलेल्या संशयित आरोपीचे नाव दिलीप दातीर नसून ते दिलीप ततार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी नाशिकरोेड पोलीस ठाण्यात पत्र देत दातीर यांच्याएैवजी एफआयआरमध्ये ततार असे नावाचा ऊल्लेख करावयास सांगितले. महावितरणने याबाबत खुलास्यामुळे घटनेत मनसे पदाधिकाऱ्यांचा दुरान्वये संबंध नसल्याचे समोर आले. परंतू, यासर्व प्रकारात महावितरणने नावात घातलेल्या गोंधळामुळे मनसेचे दातीर यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : वीजचोरीत मनसे पदाधिकाऱ्यांचा संबंध नाही ; महावितरणची माहिती appeared first on पुढारी.