नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा

पाणीपुरवठा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
शहराला पाणीपुरवठा करणार्‍या कडवा धरण स्त्रोत पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या धामणगाव उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सिन्नर नगर परिषद प्रशासनाला पूर्व नियोजनानुसार एक दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे दिवसाआड 45 मिनिटांऐवजी आता दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता हेमलता दसरे यांनी दिली. वीज वितरण कंपनीकडील तांत्रिक अडचणीमुळे कडवा योजनेच्या उद्भवाजवळील वीजपुरवठा वारंवार खंडित झाल्यास प्रशासनावर एक दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा करण्यावर मर्यादा येणार आहेत. अशा परिस्थितीत नाइलाजस्तव शहरवासीयांना दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा करण्याची प्रशासनावर वेळ येऊ शकते. त्यासाठी प्रशासनातर्फे नागरिकांना निर्धारित वेळेपेक्षा पंधरा मिनिटे जास्त वेळ पाणीपुरवठा करण्यात येईल, अशी माहिती दसरे यांनी दिली आहे.

पाणी जपून वापरावे
नागरिकांनी तांत्रिक अडचणीचे गांभीर्य ओळखून पाणी जपून वापरावे. यानंतरचा पाणीपुरवठा विजेच्या समस्येमुळे आता दोन दिवसांआड होऊ शकतो, हेही गृहीत धरावे. त्यानुसार पुढील दोन दिवस पुरेल एवढा पाणीसाठा करून ठेवावा व तो पुढच्या रोटेशनपर्यंत जपून वापरावा, असे आवाहन दसरे यांनी केले.

दिवसाआड पाणी, तेही अनियमित
उन्हाळ्याचे दिवस असल्याने पिण्यासाठी अतिरिक्त पाणी लागत आहे. त्यामुळे दिवसाआड का होईना एक तास तरी पाणी सोडावे, अशी मागणी विजयनगरमधील नागरिकांनी केली आहे. नगरपालिकेने उपनगरात दिवसाआड पाणी तेही 45 मिनिटे असे नियोजन केले होते. परंतु तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करीत तीन दिवसांआड पाणी आल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. 45 मिनिटे पाणीपुरवठा कमी होतो. उशिरा पाणी आल्यामुळे पैसे खर्चून टँकर घ्यावा लागतो. इतर नगरपालिकेपेक्षा सिन्नर नगरपालिकेची पाणीपट्टी जास्त असूनही दिवसाआड पाणी, शिवाय पाणी बिल भरण्यासाठी वसुलीचा तगादा केला जातो. हा अन्याय असून, नगरपालिकेने नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी विजयनगरच्या नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : वीज उपकेंद्रात बिघाड झाल्याने दोन दिवसांआड एक तास पाणीपुरवठा appeared first on पुढारी.