नाशिक : वृक्ष छाटले, रहाट पाळणे लागले पण कोणी नाही पाहिले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील बी. डी. भालेकर मैदान आणि आत्ताचे वाहनतळाच्या जागेवरील सार्वजनिक गणेशोत्सव म्हणजे शहराचे वैशिष्ट्यच. परंतु, याच ठिकाणी आता इलेक्ट्रीक रहाट पाळणे लागले असून, त्याबाबत मनपा अधिकाऱ्यांनाही ठाऊक नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे हाताने फिरविण्याच्या पाळण्यांना परवानगी दिली असताना त्याठिकाणी मात्र इलेक्ट्रीक पाळणे बसविले आणि त्यासाठी वृक्षांची छाटणीदेखील केली असून, ही बाब मनपा अधिकाऱ्यांच्या गावी नाही.

गेल्या दोन वर्षांपासून काेरोना महामारीमुळे सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होऊ शकला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने निर्बंध हटविल्याने यंदाचा गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यानुसार नाशिक शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उंच गणेश मूर्तींबरोबरच देखावे आणि आरासही भव्य दिव्य उभारल्या आहेत. बी. डी. भालेकर मैदानावरील सात सार्वजनिक गणेश मंडळेही त्यास अपवाद नाही. याठिकाणी नाशिककर मोठ्या प्रमाणावर आरास पाहण्यासाठी गर्दी करत असतात. चालायला देखील जागा राहत नाही, अशी स्थिती शेवटच्या सहा ते सात दिवसांची असते. अशा भाऊगर्दीत नाशिक मनपा प्रशासनाच्या पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी हरिश्चंद्र यांनी खाद्यपदार्थ, खेळणी तसेच रहाट पाळण्यांना भालेकर मैदानावरच परवानगी देऊन टाकली आहे. परवानगी देताना हाताने फिरविणारे छोटे पाळणे व खेळणे उभारणीसाठी १५ बाय २० चौ. मी जागा ३१ आॉगस्ट ते ९ सप्टेंबर २०२२ या कालावधीसाठी देण्यात येत असल्याचे परवानगी पत्रात म्हटले आहे. परंतु, प्रत्यक्षात हाताने फिरविणारे नव्हे, तर चक्क इलेक्ट्रीक पाळण्याचे विविध प्रकार उभारण्यात आल्याचे पहावयास मिळत आहे.

अग्निशमन म्हणते ठाऊक नाही

अग्निशमन विभागानेही नियमांकडे डोळेझाक केली आहे. याबाबत अग्निशमन विभागाचे प्रमुख संजय बैरागी यांना विचारले असता, त्यांनी याबाबत मला काही ठाऊक नाही. परवानगी दिली किंवा नाही हे पहावे लागेल, असे उत्तर दिले. भालेकर मैदानावर देखावे पाहण्यासाठी हजारो गणेशभक्त येणार आहेत. अशा वेळी त्यांच्या जिवीताला रहाट पाळण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो. वास्तविक मोठ मोठे पाळणे उभारताना त्याचे इन्स्पेक्शन करण्याची आवश्यकता असते. परंतु, याप्रकरणाकडे पश्चिम विभाग आणि अग्निशमन विभागाने सर्रास दुर्लक्ष केल्याचे दिसून येते.

मनपाकडून अद्याप कोणत्याही प्रकारचे पत्र आलेले नाही. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही अटीशर्ती टाकूनच परवानगी दिली जाईल. महिला सुरक्षारक्षक नेमणे, महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र रांग, सीसीटिव्ही तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने घेतलेली खबरदारी पाहूनच पुढील कार्यवाही केली जाईल. – दत्ता पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भद्रकाली.

“पश्चिम विभाग तसेच कर विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्थळ पाहणीचे आदेश दिले आहेत. मोठे पाळणे असल्यास ते काढण्याची कारवाई केली जाईल. संबंधितांना नोटीस बजावली जाईल”. – अर्चना तांबे, उपआयुक्त, मनपा.

हेही वाचा:

The post नाशिक : वृक्ष छाटले, रहाट पाळणे लागले पण कोणी नाही पाहिले appeared first on पुढारी.