देवळा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ; देवळा तालुक्यातील खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात बुधवार (दि. ८) विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली.
देवळा तालुक्यातील पश्चिम भागात असलेल्या खर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असलेल्या एका वैद्यकीय अधिकारी निवासस्थानात डॉ. जितेंद्र पवार हे सहकुटुंब राहत असून त्यांच्या निवासस्थानातील किचन रूम मध्ये बुधवार (दि. ८) रोजी डॉ. पवार यांच्या पत्नीला दरवाजा जवळ सर्प दिसतात त्यांनी दवाखान्यातील उपस्थित कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. यावेळी कर्मचारी लागलीच धावून आल्याने त्यांनी हा साप शिताफीने मारला. हा सर्प सर्वात विषारी अशा मणियार जातीचा असल्याचे सांगितले जाते. यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
खर्डे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या आजूबाजूला गवताचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सहाजिकच अशाप्रकारे साप निघू शकतात. तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही जुनी झाली असून, तिचे निर्लेखन देखील झाले आहे. कर्मचारी निवासस्थानांची देखील दुरवस्था झाली आहे. यामुळे कर्मचारी निवासस्थानात राहत नाही. पावसाळ्यात आरोग्य केंद्राची इमारत गळते. याची मध्यंतरी दुरुस्ती करण्यात आली. आरोग्य केंद्राच्या नवीन प्रस्तावित इमारतीसाठी जिल्हा परिषदने निधी मंजूर केला असून, ह्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी अशी मागणी सरपंच जिभाऊ मोहन, उपसरपंच सुनील जाधव यांनी केली आहे.
The post नाशिक : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निवासस्थानात निघाला विषारी साप appeared first on पुढारी.